गूड न्यूज… मान्सून 15 मे रोजी अंदमानात!

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे पट्टे तयार झाल्याने
पाच दिवस अगोदर येणार

पुणे: बंगालच्या उपसागरात असनी चक्रीवादळ शमताच कमी दाबाचे पट्टे तयार झाल्याने मान्सूनची वाट सुकर झाली. यामुळे दक्षिण अंदमान व बंगालच्या उपसागरात 15 मे रोजीच मान्सून दाखल होईल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, दरवर्षी मान्सून अंदमानात 20 मे च्या दरम्यान दाखल होत असतो. मात्र, अनुकूल स्थितीमुळे तो पाच दिवस अगोदर येण्याची शक्यता आहे.

‘असनी ’ क्रीवादळाचा प्रभाव कमी होताच बंगालच्या उपसागरात बुधवारी सायंकाळी कमी दाबाचा पट्टा तयार झाला. या पट्ट्याचे 12 मे रोजी तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यांत रूपांतर झाल्यामुळे आंध्रप्रदेश व रॉयलसीमाच्या किनारपट्टीवर अतिवृष्टी होत आहे. वार्‍याचा वेग किनारपट्टीवर ताशी 40 ते 50 किलोमीटर आहे. त्यामुळे मान्सूनचे आगमन सुकर होण्यास मदत झाली आहे. यामुळे यंदा हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजापेक्षाही पाच दिवस आधीच मान्सून या भागात दाखल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या अनुकूल स्थितीमुळे तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, केरळ, लक्षव्दीप यासह ईशान्य भागातील नागालँड, मिझोराम, त्रिपुरा या भागातही पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस बरसेल असा अंदाज हवामान वर्तविला आहे. दरम्यान, राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, पंजाब, हरियाणा, जम्मू कश्मीर, दिल्ली, महराष्ट्रातील विदर्भ या भागात 16 मे पर्यंत उष्णतेची तीव्र लाट कायम राहिल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *