बीड: मुकुंद कुलकर्णी
संघर्षाला भीत नाही, ताठ आहे माझा कणा..! म्हणत आयुष्यात शेवटपर्यंत लढणारे नेतृत्व. सामान्य माणसाला आपलंसं करून गल्ली ते दिल्ली असा राजकीय प्रवास करणारे लोकनेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा आज सहावा स्मृतिदिन ! तीन जून रोजी या लोकनेत्याचा स्मृतिदिन संघर्षदिन म्हणूनही साजरा केला जातो. परळीजवळ असलेल्या गोपीनाथ गडावर या दिनी मुंडे भक्तांची मांदियाळी जमते. तेथून राजकीय निर्णयही जाहीर केले जातात. यंदा मात्र कोरोनाच्या सावटाखाली घराघरातच प्रतिमेसमोर दिवे लावून साहेबांचं स्मरण करण्याचं आवाहन भाजपनेत्या पंकजा मुंडे यांनी केलं आहे.
पंकजा मुंडे या देखील येणार नसून मुंबईतूनच स्मरण करणार आहेत. बीडच्या खासदार डाॅ. प्रीतम मुंडे या निवडक लोकांच्या उपस्थितीत गडावर समाधीस्थळी नतमस्तक होणार आहेत. बीड जिल्ह्यातील जनतेसाठी तीन जून २०१४ हा दिवस काळादिन म्हणून उजाडला ! केवळ आठवडाभरापूर्वी केंद्रीय ग्रामविकास मंत्रीपदाची शपथ घेतली. तीन जूनला परळीला नागरी सत्कार होणार होता. मात्र, सत्काराचे हार श्रद्धांजलीची फुले झाली. जनतेवर दु:खाचा डोंगर कोसळला. आज सहा वर्षे होऊनही जनता दु:खातून सावरली नाही. या लोकनेत्याचा स्मृतिदिनही कोरोनाच्या सावटाखाली होत आहे.
यासंदर्भात पंकजा मुंडे यांनी जाहीर केले आहे. त्या म्हणतात, दोन जून 2014 ला जाऊन जग थांबावं ! असं मनाला वाटतं. घरून आमरस खाऊन साहेब दिल्लीला गेले. तेच त्यांचं घरचं अखेरचं जेवण! मग त्यांचं पार्थिव देखील घरी आणता आलं नाही. म्हणून तीन जून उजाडला नाही पाहिजे असं वाटतं ! त्यांच्या आठवणी, विचार घेऊन सहा वर्षांपासून आपण जगत आहोत.
तीन जून हा आपण संघर्षदिन म्हणून साजरा करतो. गोपीनाथ गड माणसांनी तुडूंब भरलेला असतो. रामराव ढोक महाराजांचं कीर्तन, पुढील कार्यक्रम व प्रसाद असा दरवर्षीचा नियम. यंदा कोरोनामुळे सगळं रद्द करून लाॅकडाऊनच्या नियमांचं काळजीपूर्वक पालन करायचं आहे. गडावर दर्शनाला जायचं नाही. मी मुंबईला आहे मला भेटायला देखील यायचं नाही. गडावरील कार्यक्रम साधा व मोजक्या लोकांत असेल. तो LIVE दाखवता येईल. सगळ्यांनी घरातच दुपारी बारा ते सायंकाळी सहा या वेळेत कुटुंबियांसह साहेबांच्या फोटोसमोर महिला, पुरूष उजव्या डाव्या बाजूला उभे राहून दोन दिवे लावायचे आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अन्नदान, रक्तदान, मास्क, औषधी वाटप करावे. फोटो काढून माझ्या फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामवर पाठवावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.