# गोपीनाथराव मुंडे यांची शिदोरी माझ्या पाठीशी त्यामुळे माझी चिंता सोडा…

पंकजा मुंडे यांनी अफवा पसरविणाऱ्यांना फटकारले

अंबाजोगाई: मी शिवसेनेत जाणार का? का आणखी कुठे जाणार? अशा अफवा व माझ्याबद्दलची भविष्यवाणी माझे हितचिंतक विनाकारण समाजात पसरवित आहेत. गोपीनाथराव मुंडे यांची शिदोरी माझ्या पाठीशी भक्कम आहे. त्यामुळे तुम्ही माझी चिंता सोडा, अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी अफवा पसरविणाऱ्यांना फटकारले

अंबाजोगाईत आ.नमिता मुंदडा यांच्या वतीने शनिवारी दुपारी त्यांच्या निवासस्थानी पंकजा मुंडे यांच्या जाहीर सत्कार करण्यात आला, या सत्काराला उत्तर देतांना पंकजा मुंडे बोलत होत्या. यावेळी आ.नमिता मुंदडा, भाजपचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, अंबासाखरचे अध्यक्ष रमेशराव आडसकर, मोहन जगताप, बाळासाहेब दोडतले, अक्षय मुंदडा, भाजपचे तालुकाध्यक्ष अच्युत गंगणे, यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या की, लोक कोरोनाचा कालावधी असल्यामुळे मी मुंबईत अडकून राहिले. मी जर घराबाहेर पडले असते तर माझ्या भोवती मोठा जमाव जमा झाल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असता. लोकांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी मी स्वत:च घराबाहेर निघणे टाळले. याचा मोठा गैरअर्थ करून पंकजाताई घराबाहेर पडत नाहीत. अशा अफवा पसरविण्यात आल्या. कोरोनाच्या काळात एकही सत्ताधारी कोविड सेंटरकडे फिरकला नाही. अशा स्थितीत खा.डॉ. प्रीतम मुंडे व अक्षय मुंदडा प्रत्येक कोविड सेंटरमध्ये जाऊन रुग्णांची भेट घेत होते. त्यांना दिलासा देत होते. तरीही माझ्याबद्दल अफवा का पसरविल्या जातात हेच मला समजत नाही. आताही मी शिवसेनेत जाणार का कुठे जाणार? अशा अफवा पसरविल्या जात आहेत. माझ्या भविष्याची चिंता तुम्ही करू नका. मी स्वत: खंबीर आहे. माझ्या पक्षाने मला भरपूर दिलंय. तसेच गोपीनाथराव मुंडे यांची शिदोरी माझ्या पाठीशी भक्कम आहे. त्यामुळे तुम्ही माझी चिंता सोडा. अशा शब्दात अफवा पसरविणाऱ्यांचा त्यांनी समाचार घेतला. मी या निवडणुकीत पराभूत झाले असले तरी लोकांपासून दुरावले नाही. इंदिरा गांधींपासून अनेकांनी पराभवांचा अनुभव घेतला. यात मी नवीन नाही. मात्र, जनतेशी जुळलेली नाळ तुटू देणार नाही. आता पक्षाने माझ्यावर मोठी जबाबदारी दिल्याने पुन्हा जोमाने कामाला सुरुवात केली असल्याचे त्यांनी सांगितले. मी मंत्री असतांना जिल्ह्यात विकास कामांसाठी भरघोस निधी आणला. या सरकारमध्ये तो निधी वापस गेला. मात्र, यांना कामे करता आले नाहीत. तुम्ही आमच्याच कामांचे नारळ फोडत आहात. काही तरी नवीन आणा. अशा शब्दात त्यांनी नाव न घेता टीका केली.

यावेळी अक्षय मुंदडा म्हणाले की, पंकजा मुंडे व माझ्या कुटुंबियांचे कौटुंबिक नाते आहे. नमिता यांच्यावर पंकजाताईंनी विश्वास टाकला व त्यांना निवडून आणले. पंकजाताईंच्या पराभवामुळे आम्ही आजपर्यंत कसलाही सत्कार स्वीकारला नाही. आज त्यांचा पहिला सत्कार केला. आणि आमच्या विजयाचा आनंदोत्सव साजरा केला. पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली पक्षवाढीसाठी काम करणार असल्याचे अक्षय मुंदडा यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आ.नमिता मुंदडा यांनी केले. सूत्रसंचालन वैजनाथ देशमुख यांनी तर आभार अ‍ॅड. संतोष लोमटे यांनी मानले.

असिमटोमॅटीक कार्यकर्ते घातकच:  कोरोना या आजारात असिमटोमॅटीक असलेले रुग्ण जसे समाजात फैलावासाठी घातक ठरतात. तसे राजकारणात असिमटोमॅटीक कार्यकर्तेही घातक आहेत. अशा कार्यकर्त्यांची चांगली पारख आपल्याला झाली आहे. भविष्यात काम करतांना अशा असिमटोमॅटीक लोकांचा बंदोबस्त कसा करायचा? याचा विचार मी केला आहे, असेही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.

ऊसतोड कामगारांना २१ रुपये दरवाढ द्या:  ऊसतोड कामगारांना २१ रुपये दरवाढ द्या. ते कामावर जातील. माझे ऊसतोड कामगार शेतकरी विरोधी नाहीत. तर शेतकऱ्यांच्या सेवेसाठी आहेत. भविष्यात या कामगारांचे होणारे नुकसान कसं भरून काढायचं हे मी पाहते. मात्र, त्यांना संकटात टाकणार नाही. दसरा होताच कोयते घेऊन ते कामावर निघतील. मात्र, त्यांना २१ रुपये दरवाढ द्या. अशी मागणीही पंकजा मुंडे यांनी यावेळी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *