दिलीप बडे अंबाजोगाईचे. कला क्षेत्रात विशेषतः चित्रकलेत आवड असणारे ते गुणी कलावंत. लहानपणा पासून चित्रकलेची आवड असल्यामुळे कॉलेज जीवनापासून त्यांनी आपले ध्येय हे चित्रकला असेल हे ठरवलेले. पुढे त्यातच करियर करायचे आहे हे ठरवल्यामुळे त्यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट मुंबई येथे पुढचे शिक्षण घेण्याचे ठरविले व ते पूर्ण केले. कांही काळ मुंबईत त्यांनी काम केले. नंतर ते औरंगाबाद येथील शासकीय स्कूल ऑफ फाईन आर्टचे मुख्य म्हणून आले शेवटपर्यंत या पदावरून निवृत्त झाले. मुळात अंबाजोगाईचे त्र्यंबक पोखरकर, भास्कर जिरे, सोनकांबळे गुरुजी, टेकाळे गुरुजी हे चित्रकलेचे शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यात त्र्यंबक पोखरकर यांनी आपल्या कलेला रंग कामातून बाहेर काढले व गव्हाच्या तनसाला आगीची पाहिजे तेवढी धग देऊन विविध रंगाच्या छटा येतील त्यापासून त्यांनी चित्र बनवायला सुरुवात केली व ते आता महाराष्ट्र, देश व दुनियेच्या परिघावर आपले नाव केले. पुढे चित्रकलेला व्यापक रूप येऊ लागले. शाळेत चित्रकला शिकलेली पोरं पुढे मुंबईला जाऊन शिकू लागली त्यात प्रमोद अपेट, शत्रुघ्न छत्रबंध, नामदेव काकडे, दीपक जोगदंड हे आपले नाव करण्यात यशस्वी होत आहेत. अंबाजोगाईत, विद्याधर पंडित, नामदेव मोरे, नेताजी यादव, गणेश कदम सह अनेक कला शिक्षक व कलावंत हे आपल्या परीने कलाक्षेत्रात आपले कार्य करून नावलौकिक मिळवत आहेत. शिल्प कलेत प्रदीप जोगदंड हे देशपातळीवर व परदेशातही आपले नाव उज्ज्वल करीत आहेत. या सगळ्यांची प्रेरणा प्रा. दिलीप बडे, त्र्यंबक पोखरकर व इतरांची आहे.
दिलीप बडे यांचा अप्रत्यक्ष परिचय हा १९८३ साली अंबाजोगाईत पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात झाला. साहित्य संमेलनाच्या तयारीत कला, सजावट व इतर सौंदर्य निर्मिती ही दिलीप बडे यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या कल्पकतेतून साकार झाली. मुख्य कमान ही बांबूच्या कलाकुसरीतून तयार करण्यात आली होती. ती इतकी आकर्षक, सुबक व देखणी झाली होती की आलेल्या प्रत्येक पाहुणा त्याची तारीफ करीत होता. आपल्या गावात संमेलन होते आहे हीच या परिश्रमाची प्रेरणा होती. तेंव्हा पासून दिलीप बडे माझ्या स्मरणात सतत राहिले. त्यानंतर त्यांचे घर धोबीघाट येथे होते. गाव सोडले तरी त्यांनी आपली अंबाजोगाईची नाळ कधीच म्हणजे शेवटपर्यंत जोडून ठेवली. इथे आई, वडील, इतर नातेवाईक असल्याने ते सतत अंबाजोगाईला येजा करीत राहिले.
पुढे त्यांच्या कलेच्या क्षेत्रातील प्रगती सतत कानावर येत असे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येतील संकुलात, कुलगुरू कार्यालयात, त्यांनी रेखाटलेली महापुरुषांच्या प्रतिमा आपल्याला आजही पहावयास मिळतात. डॉ. आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज यांचे कलर, तैलचित्र आपल्याला अनेक ठिकाणी पहावयास मिळतील. विधानभवन, महापालिका याठिकाणी त्यांचे हे पोर्ट्रेट पहावयास मिळेल. दृष्टी असलेले दिलीप बडे यांनी अनेक विद्यार्थी कला क्षेत्रात आणले व नावारूपाला आले. या चित्रकलेवर रुची असलेले समंजस जाणकार वर्ग आता तयार झाला. चित्रांचे आकलन करणे, समजून घेणे ही खूप कठीण गोष्ट आहे. एकाच विषयात आपले लक्ष केंद्रित करून आपली वेगळी छाप निर्माण करणारे अनेक गुणी कलावंत आहेत. पण बडे सरांनी आपली कला वेगवेवगळ्या माध्यमांचा वापर करून अवगत केली व त्याला प्रतिष्ठा मिळवून दिली. ही कला जोपासताना व त्यात प्रगतीचे अनेक शिखरे पार करताना मात्र त्यांचे पाय नेहमी जमीनीवरच राहिले. आपली कला जोपासताना माणुसकी, गावचा अभिमान, आणि वागणे यात कधीच तसूभरही फरक केला नाही. उलट माझं गाव कलेने, परंपरेने, संस्कृतीने किती श्रीमंत आहे हेच सांगत असत. खूप गरिबी, कष्टातून खस्ता खावून आलो हा लवलेश त्यांनी कधीही दाखवला नाही. सर्व जाती, धर्म, श्रीमंत, गरीब, लहानथोर असा भेद कधीच त्यांनी मानला नाही. खूप जिव्हाळ्याचे संबंध त्यांचे समाजाच्या सर्व स्तरात आजही कायम राहिले. त्याचे कारण कलावंत म्हणून त्यांनी आत्मसात केलेले आकलन, विचार व त्यातून आलेली प्रगल्भता हेच त्यावर एकमेव कारण. दुस्वास कुणाबद्दल त्यांच्या तोंडी कधीच आला नाही. म्हणूनच ते एका उंचीवर जाऊन पोहचले.
मी यशवंतराव चव्हाण स्मृती समितीत, मराठवाडा साहित्य परिषदेच्या कामात रमलो. संगीत, ललित कला, सामाजिक व इतर माध्यमात सतत कार्यमग्न झालो. त्यातून पुढे माझी त्यांची मैत्री झाली. राम मुकद्दम, भगवानराव लोमटे, प्रा. रंगनाथ तिवारी, डॉ. द्वारकदास लोहिया, शैला भाभी, अमर हबीब, अशोक गुंजाळ, प्रा. माधव मोरे, प्रा. एस. के. जोगदंड, कॉ. गंगाधर बुरांडे, या व इतर मान्यवर व्यक्तींबाबत त्यांच्या मनात नितांत आदराची व आपुलकीची भावना होती. अंबाजोगाईला आले की जसा वेळ मिळेल तसा त्यांना भेटणे, गप्पा करणे हा त्यांचा स्थायी भाव होता. पुढे त्यांची व माझी चांगली मैत्री झाली. मराठवाडा दैनिकाचा वार्ताहर झालो, स्वतःच दैनिक चालवल. त्याकाळी आम्ही सतत जसे जमेल तसे भेटत असू.
यशवंतराव चव्हाण स्मृती समिती, अंबाजोगाई ही गेली ३८ वर्षांपासून साहित्य, संगीत, शेती, युवक व महिला, ललित कला आदी क्षेत्रात काम करते. यासाठी ३ दिवसीय समारोह आयोजित केला जातो. यात चित्रकलेची विद्यार्थ्यांत आवड व रुची निर्माण व्हावी या उद्देशाने शालेय पातळीवर रंगभरण व स्मरणचित्रांची स्पर्धा घेत असतात. त्यात अनेक शाळा व कला शिक्षक जोडले गेले. पुढे अनेक स्पर्धक कला क्षेत्रात कार्य करत आहेत. त्यानिमित्ताने प्रा. दिलीप बडे यांचं मार्गदर्शन नेहमीच असे एवढेच नाही तर ते सेवेत कार्येरत असताना जसे जमेल तसे येत राहिले. समितीच्या या उपक्रमाला २०१० साली २५ वर्षे झाली म्हणून त्या वर्षी आंबाजोगाईतील परंतु बाहेर असलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवर यांना भूमिपुत्र सन्मान करण्याची सूचना पुढे आली. त्यात स्थापत्य शास्रात रामचंद्र देखणे, अभिनयात प्रा. दिलीप घारे, कला क्षेत्रात प्रा. दिलीप बडे व उद्योग क्षेत्रात व्यंकट शिंदे यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते केला गेला. अत्यंत नम्रपणे दिलीप बडे यांनी तो स्वीकारला. शालीनता व सभ्यता याचा उत्तम आदर्श असलेले बडे यांचे यावेळचे मनोगत सर्वानाच भावलेले होते. नंतर २०१५ साली ३० व्या यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहात चित्रकला व बाल आनंद मेळावा यात नगरचे सुप्रसिद्ध चित्र व शिल्प कलाकार प्रमोद कांबळे यांना व दिलीप बडे यांना पाहुणे म्हणून निमंत्रित केले. त्यात प्रमोद कांबळे यांनी चित्रकला स्पर्धक विद्यार्थ्यांसमोर पेन्सिलस्केच, वॉटर कलर पोर्ट्रेट व एक शिल्प बनविण्याचे प्रात्यक्षिक केले. तर बडे सरांनी आपल्या कुंचल्यातून कलर व पेन्सिल स्केचचे प्रात्यक्षिक करून दाखवले. दोन्ही मान्यताप्राप्त कलावंत यांनी सहजपणे आपली कला प्रदर्शित करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन तर केलेच. पण भविष्यात चित्र व शिल्पकला यात आपण शिक्षण घेऊन प्राविण्य मिळविले तर उज्ज्वल भविष्य जगता येईल हे पटवून सांगितले. कले विषयी आपली निष्ठा कशी असली पाहिजे याचे हे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे दिलीप बडे.
त्यांना अंबाजोगाईबद्दल अपार प्रेम व जिव्हाळा होता हे पदोपदी जाणवत असे. आपल्या गावाबद्दल अभिमान त्यांना वाटत असे. अंबाजोगाईच्या सामाजिक, साहित्य, नाट्य, संगीत चळवळी, गावाची ठेवण व संस्कृती याबद्दल दिलीप बडे तासंतास बोलत असत. निवृत्ती नंतर ते अंबाजोगाईला सतत यायला लागले. एकदा मराठवाडा साहित्य परिषद शाखा अंबाजोगाईच्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाचे मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित राहिले. त्यावेळचे त्यांचे भाषण अंबाजोगाईच्या त्यांच्या आठवणीने भरलेले होते. त्यापूर्वी त्यांना अंबाजोगाई साहित्य संमेलनात कला क्षेत्रातील योगदाना बद्दल पुरस्कारही देण्यात आला होता. यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहा बाबत ते नेहमी गावच्या इतिहासातील व मराठवाड्याने महाराष्ट्राला दिलेले साहित्य, संगीत, शेती, ललित कला याचे मोठे योगदान अभिमास्पद आहे असेच उद्गार ते काढत असत. मी अलीकडे त्यात करत असलेल्या आयोजन व सर्वच कलावंत, व्याख्याते व पुरस्कार निवडी बद्दल माझं भरभरून कौतुक करीत असत. निवृत्ती नंतर ते यशवंत समारोहाला तिन्ही दिवस अंबाजोगाईत असायचे. जुने सर्व मित्र एकत्र करून गप्पा मारणे हा त्यांचा स्थायीभाव त्यांनी कायम जपला. त्यांचे मित्रात कान्हाभाऊ शर्मा, अमर हबीब, एस. के. जोगदंड व इतर मित्र यांना भेटत राहणे हा शिरस्ताच होता. त्यात मी ही आलोच.
कोविड-१९ च्या काळात प्रवास कमी झाला. तशा भेटीही कमी झाल्या. याच काळात गेल्या २०२० यावर्षी यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह आयोजित केला होता. त्यातील यशवंतराव चव्हाण स्मृती साहित्य पुरस्कार जालना येथील सिद्धहस्त लेखिका रेखा बैजल यांना घोषित झाला पण त्या येऊ शकल्या नाहीत. सामान्य परस्थिती झाल्यावर २०२१ च्या डिसेंबर महिन्यात तो जालना येथील त्यांच्या घरी सन्मानाने प्रदान करण्याचे ठरले. औरंगाबादला गेलो. कोणाच्या हस्ते द्यावा हा विचार चालू होता. मी दिलीप बडे यांना फोन केला. प्रयोजन सांगितले. आपल्या मुख्य उपस्थितीत हा पुरस्कार बैजल यांना द्यायचा आहे. त्यांना फार आनंद झाला. लगेच होकार दिला. रात्री त्यांना भेटायला गेलो. गप्पा झाल्या. सकाळी मी व दिलीप बडे जालन्याला गेलो. तिथे डॉ. संजीवनी तडेगावकर यांना पाहुण्या म्हणून बोलावले होते. कांही महत्वाच्या व्यक्ती बैजल यांच्या घरी जमा झालेले. पुरस्कार प्रदान केल्यावर दिलीप बडे यांनी रेखा बैजल यांच्या साहित्य कृतींवर उत्तम भाष्य केले. रेखाताई यांना पण बडे यांच्या हस्ते पुरस्कार दिला याच सार्थक झाल्याच्या भावना व्यक्त केल्या. एक वर्षानंतर घरी येऊन पुरस्कार प्रदान केला त्याबद्दल त्यांनी माझं व समितीचे कौतुक केले. व दिलीप बडे यांनी अंबाजोगाईच्या सांस्कृतिक परंपरा ही सन्मान देण्याची आहे हे आवर्जून सांगितले. तो माझा व बडे यांचा शेवटचा सार्वजनिक कार्यक्रम ठरला.
मी गेल्या वर्षी खादी भांडार सुरू केले. हे त्यांना सांगितले. त्याच आठवड्यात ते दुकानी आले. कांही मित्रांना घेउन आले. मी दुकानातील ९ राज्यातील वेगवेगळी खादी कपडा ठेवला याच त्यांना फारच आश्चर्य वाटलं. अलीकडे ते माझ्याकडूनच कपडे खरेदी करू लागले. त्यांना कपड्याची फार आवड व पारख होती. खादी व त्यांचे जुनेच नाते आता नव्याने घट्ट झाले होते.
माझी व दिलीप बडे यांची अंबाजोगाई पेक्षा औरंगाबादेत जास्त भेट होत असे. पूर्वी ते राहत असलेल्या नंदनवन कॉलनीत प्रा. प्र. ई. सोनकांबळे यांच्याकडे मी नेहमी जात असे. एकदा त्यांचा मुलगा डॉ. अश्विन सोनकांबळे यांनी याच कॉलनीत अंबाजोगाईचे दिलीप बडे राहतात चला मी त्यांचे घर पण दाखवतो व त्यांची भेट घालून देतो. त्याला आता ३० वर्षे झाली. तेंव्हा पासून अनेक वेळा मी त्यांच्या घरी जमेल तसे भेटत राहिलो. २०२२ च्या जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मी औरंगाबादला गेलो. साहित्य परिषदेच्या गेस्ट हाऊसला मुक्काम होता. सायंकाळची वेळ होती. मी बडे सरांना फोन केला सर मी आलोय. ते म्हणाले घरी या. स्टुडिओ मध्ये काम चालू आहे. ते दाखवतो मग जेवायला जाऊ. मी गेलो. मला घ्यायला गाडी घेऊन छावणीतील इंग्लिश शाळे जवळ आले. स्टुडिओत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्णाकृती दहा फूट उंचीची पोर्ट्रेटचे काम चालू होते. इतर जुन्या कांही फ्रेम्स त्यांनी दाखवल्या. यशवंतराव चव्हाण यांचे असेच एक मोठे चित्र त्यांनी विद्यापीठात बनवून दिले होते ते फारच अप्रतीम झाले होते. त्यानंतर हे चित्र माझ्याकडून होत आहे याचा अतोनात आनंद त्यांना झाला होता. गप्पा करत जेवलो त्यानंतर मला साहित्य परिषदेत आणून सोडले. इतका मोठा कलावंत पण नम्रता व आदर कसा करावा याचा परिपाठ म्हणजे दिलीप बडे. पूर्वी पं. नाथराव नेरळकर, बडे, प्र. ई. यांच्या भेटी ठरलेल्या. ती माझी घरेच होती. आता नाथराव व प्र. ई. नाहीत तरी त्यांच्या घरातील प्रत्येकांशी वेगळ नात आजही आहे. आता दिलीप बडे गेले. तसे औरंगाबाद माझ्यासाठी पोरके झाले. हक्काने जिथे जायचो तो हक्क अबाधित आहे. पण………!
-दगडू लोमटे, अंबाजोगाई
मोबाईल: 9823009512