पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशीचे निर्देश
बीड: 2015 ते 2021 या काळात बीड जिल्ह्यातील विविध देवस्थानांच्या जमिनी, ईनामी जमिनी अधिकाऱ्यांशी संगनमत करून परस्पर नावावर करून घेतल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून, यासंबंधी एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नेतृत्वात चौकशी समिती नेमून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, असे निर्देश बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
बीड तालुक्यातील नामलगाव येथील श्री गणपती मंदिराची 26 एकर जमीन परस्पर नावे करून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या संबंधीचे फेरफार निकाल तात्काळ थांबविण्यात यावेत असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील भुसुधार विभागाने जिल्ह्यातील खालसा झालेल्या इनामी जमिनी व देवस्थानच्या जमिनीचे सर्व निकाल, फेरफार व अन्य दस्तावेज, संबंधित जमिनी विक्री करण्यासाठी देण्यात आलेल्या परवानग्या या सर्व बाबींची सखोल चौकशी करण्यात यावी.
देवस्थानच्या जमिनी व इनामी जमिनी खालसा करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी कोणती पद्धत वापरली तसेच कागदोपत्री हेराफेरी करण्यात आली आहे का? या सर्वच बाबींची सखोल चौकशी करण्यात यावी, असेही ना.मुंडे यांनी म्हटले आहे.
दरम्यान देवस्थानच्या जमिनी व इनामी जमिनी कुण्या एखाद्या अधिकाऱ्याशी संगनमत करून बेकायदेशीररीत्या खालसा दाखवून त्या परस्पर नावे करून घेणे ही बाब गंभीर असून, या प्रकरणी तात्काळ चौकशी करण्यात यावी, तसेच यामध्ये दोषी आढळलेल्या सर्वांवर कडक कारवाई करण्यात यावी, असे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले असून, यासंबंधी विभागीय आयुक्त श्री सुनील केंद्रेकर यांच्याशी देखील चर्चा करणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात काही वर्तमानपत्रात आलेल्या बातम्यांची दखल घेऊन ना. मुंडे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. असे प्रकार अजिबात खपवून घेतले जाणार नसून, यातील दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांना निलंबित केले जाईल; असा इशाराही त्यांनी दिला आहे