# कोरोना संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेऊन यंत्रणांनी अधिक प्रभावी नियोजन करावे -पालकमंत्री सुभाष देसाई.

 

औरंगाबाद: जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने शासकीय आरोग्य यंत्रणांच्या सक्षमीकरणाला प्रथम प्राधान्य असून त्यादृष्टीने शासनस्तरावर पाठपुरावा करुन पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करुन दिले जाईल. येत्या काळात कोरोना संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेऊन यंत्रणांनी अधिक प्रभावी नियोजन करावे, असे निर्देश राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना अनुषंगाने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबतची आढावा बैठक पालकमंत्री श्री.देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी त्यांनी संबंधितांना निर्देश दिले. बैठकीस जिल्हाधिकारी उदय चौधरी, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, महानगरपालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मंगेश गोंदावले, पोलिस अधीक्षक (ग्रामीण) मोक्षदा पाटील, घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर, उपजिल्हाधिकारी रिता मेत्रेवार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री श्री.देसाई यांनी घाटीमध्ये आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी  वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाकडे पाठपुरावा करण्यात येईल. तसेच घाटी, जिल्हा रुग्णालयात आवश्यक पायाभूत सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन सर्व रुग्णांना, त्यांच्या संपर्कातील, संशयितांना योग्य उपचार उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने इतर रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये, इतर पर्यायी ठिकाणे सोयीसुविधांसह सज्ज ठेवावी, असे निर्देश दिले.

जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, जिल्हा रुग्णालय, घाटी आणि महानगरपालिका या सर्व यंत्रणा समन्वयपूर्वक चांगले काम करत असून जिल्ह्यातील रुग्णांचा रिकव्हरी रेट २६ टक्के आहे, ही समाधानाकारक बाब असून जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी याच पद्धतीने व्यापक प्रमाणात सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयातून प्रभावी नियोजन करावे. जेणेकरुन येत्या काळात हा संसर्ग आपल्याला यशस्वीरित्या रोखता येईल, असे निर्देश देऊन पालकमंत्री म्हणाले की, ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आहे ही चांगली बाब असून याच पद्धतीने लोकसहभागातून यंत्रणांनी जिल्ह्यात कोरोनामुक्तीसाठी उपाययोजना राबवाव्यात. वारकरी, धर्मगुरु, जनमाणसांत प्रभाव असलेल्या व्यक्तींद्वारे फोन, ऑडिओ, व्हीडीओ संदेशाद्वारे जनजागृती करुन लोकसहभाग वाढवण्यावर भर द्यावा. तसेच या लॉकडॉऊनच्या काळात शेतक-यांच्या कापूस खरेदीची प्रक्रिया कालमर्यादेत पूर्ण करावी. त्यासाठी सीसीआय, कॉटन फेडरेशनच्या प्रमुखांकडे पाठपुरावा केल्या जाईल, असेही पालकमंत्री यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *