नांदेड: मराठी नववर्ष गुढीपाडवा सणावर कोरोनाचे संकट असल्याने यावर्षी सर्व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले असले तरी गुढीपाडवा पहाट २०२१ हा भाव-भक्ती गिताचा कार्यक्रम १३ एप्रिल रोजी सकाळी सात वाजता फेसबुक लाईव्हवर कोरोना १९ चे नियम पाळून सादर केला जाणार आहे.
मराठी नववर्षानिमित्त गुढीपाडव्याच्या निमित्ताने दरवर्षी वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम होतात, मात्र यावर्षी राज्यावर तसेच देशावर कोरोनाचे संकट वरचेवर वाढत आहे. मोठ्या प्रमाणात वाढत असलेले मृत्यू व रुग्णांच्या संख्येतील वाढ हा चिंतेचा विषय बनला आहे. महाराष्ट्र शासनाने यावर्षी या गुढीपाडव्यानिमित्त कुठलेही सांस्कृतिक व मिरवणुकीचे कार्यक्रम काढू नयेत, असे आदेश जारी केले आहेत. कोरोना संकटाच्या या पाश्र्वभूमीवर कोविड-१९ च्या नियमांचे पालन करुन गुढीपाडवा पहाट हा विशेष कार्यक्रम फेसबुकवरुन सादर केला जाणार आहे. या कार्यक्रमाची निर्मिती-दिग्दर्शन-संकल्पना विजय जोशी व गोविंद पुराणिक यांचे असून, या कार्यक्रमाचे उत्कृष्ट संगीत संयोजन आणि नियोजन प्रमोद देशपांडे यांनी केले आहे.
या कार्यक्रमाला निवेदक म्हणून रवी नांदेडकर हे पहिल्यांदाच या व्यासपीठावर आपले निवेदन सादर करणार आहेत. मराठवाड्यातील तसेच शहरातील गाजलेल्या कलावंतांच्या भाव-भक्ती गितांच्या रचना या कार्यक्रमात सादर होणार आहेत. सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्कृती मंच नांदेडच्या वतीने करण्यात आले आहे. १३ एप्रिल रोजी सकाळी सात वाजता या कार्यक्रमाचे फेसबुकवरुन सादरीकरण होणार आहे.