# आयडीबीआय बँकेवर हॅकर्सचा दरोडा; साडेचौदा कोटी रूपयांवर डल्ला.

नांदेडच्या वजीराबाद शाखेतील प्रकार

नांदेड: आयडीबीआय बँकेच्या वजीराबाद नांदेड येथील शाखेतून शंकर नागरी सहकारी बँकेचे खाते हॅक करून आरटीजीएस व एनएफटीच्या आधारे हॅकर्सने जवळपास १४ कोटी ५0 लाख रुपये लंपास केले आहेत. हा प्रकार बुधवारी दुपारी उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे मोठी खळबळ उडाली आहे़. या प्रकरणी शंकर नागरी बँकेच्यावतीने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून चौकशीची मागणी करण्यात आली आहे़

राज्यात सर्वत्र हॅकर्सने धुमाकूळ घातला असून नांदेड शहरातील ही पहिली घटना घडल्यामुळे  खळबळ उडाली असून बँकेच्या खातेदारात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे़. २ डिसेंबर २०२० ते ३ जानेवारी २०२१ या कालावधीत शंकर नागरी सहकारी बँकेच्या खात्यातून १४ कोटी ४६ लाख ५ हजार ३४७ रुपये हॅकर्सने लंपास केल्याचा प्रकार बँकेच्या लक्षात आल्यानंतर याबाबत आयडीबीआय बँकेला चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. मात्र, आयडीबीआय बँकेने कुठलीही पावले उचलली नाहीत. यामुळे ५ जानेवारी रोजी आयडीबीआय बँकेच्या विरोधात शंकर नागरी बँकेच्या वतीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रितसर तक्रार देवून १४ कोटी ५0 लाख रुपये कसे वळते झाले याची चौकशी करावी आणि योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी पत्राद्वारे केली आहे. तर वजीराबाद येथील आयडीबीआय बँकेच्या शाखेने कोणतीही पूर्व सूचना न देता संशयास्पद काही व्यक्तीच्या खात्यावर परस्पर रक्कम वळती करण्यात आली आहे, असा आरोप शंकर नागरी सहकारी बँकेच्या वतीने करण्यात आला आहे. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *