पुणे: उदयकाळ फाउंडेशन संचलित साऊ एकल महिला समिती आयोजित मकर संक्रांत निमित्ताने परंपरेला समाज प्रबोधनाची जोड देऊन विधवा एकल महिलांचा हळदी – कुंकू कार्यक्रम झाला.
विधवा महिलेचा हळदी – कुंकवाचा विधायक कार्यक्रम पुणे येथील राष्ट्र सेवा दल कार्यालय येथे घेण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे मराठी सिने कलाकार, सौ. जानव्ही पागे देशपांडे, सौ. आरती मयूर बागुल, सचिव – उदयकाळ फाउंडेशन, मा. मिनाक्षी नवले, वंचित विकास संस्था, सौ. जयश्री पाथरकर, अध्यक्ष – लोकमंगल सर्वसेवा सोसायटी, पुणे व मा. श्री. राम माने सर, सचिव – आंतरभारती, पुणे शाखा, श्री. शिवराज सूर्यवंशी, व्यवस्थापक – राष्ट्र सेवादल, पुणे यांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यक्रमाचे प्रास्ताविक झाले तसेच उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले.
एकल महिलांचा हळदी- कुंकू कार्यक्रम हा परंपरेला छेद देत दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील बदलत्या जीवनमानात महिलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून उदयकाळ फाउंडेशनच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी व औषधी उपचार करण्यात आले. उदयकाळ फाउंडेशन संस्थेने एकल महिलांसाठी केलेल्या कामकाजाचा बद्दल माहिती सौ. स्वाती पांचाळ ताई यांनी दिली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सौ. जानव्ही पागे देशपांडे यांनी महिलांशी एकटेपण पेलताना या विषयावर संवाद केला. आयुष्यात संकट आली तरी संघर्ष हा करावा लागतो. महिलाही खंबीरपणे आयुष्य हे पेलत असते. आपल्या देशाच्या राष्ट्रपती यांच्या जीवनाबद्दल त्यांनी माहिती दिली. आज अनेक भगिनींना घरातील कमवता व्यक्ती गेल्यामुळे घरातील सर्व जबाबदारी महिलेवर आहे. मुलांचे शिक्षण कुटुंबाची जबाबदारी या सर्व परिस्थितीमध्ये तिचं एकटे पण पेलत असताना तिला समजून घेणे हे अत्यंत गरजेचं असतं. या दृष्टिकोनातून उदयकाळ फाउंडेशन ही संस्था गेली चार वर्षापासून विधवा महिलांसाठी काम करत आहेत.
सौ जयश्री पाथरकर ताई यांनी महिलांना खादी ग्रामोद्योग व केंद्र सरकारच्या विश्वकर्मा योजनेविषयी माहिती दिली. महिलांना स्वयंरोजगाराच्या दृष्टिकोनातून अनेक योजना उपलब्ध आहेत. योजनेचा लाभ घेण्यासाठी उदयकाळ संस्थेच्या वतीने वेळोवेळी सहकार्य व मार्गदर्शन महिलांना करण्यात आले आहे.
हळदी- कुंकू कार्यक्रमांमध्ये एकल महिलांचे महाराष्ट्रामध्ये साहू एकल महिला समिती ही मा. श्री. हेरंब कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाने सुरू करण्यात आली. या समितीच्या माध्यमातून एकल महिलांचे सभासद नोंदणी करण्यात आली प्रत्येक महिलेला ओळखपत्र वाटप करण्यात आले. भविष्यात या ओळख पत्रामुळे शासकीय योजनेचा लाभ घेताना एकल महिलांना प्रशासकीय स्तरावर काही अडचण निर्माण झाली तर साऊ एकल महिला समिती ही त्यासाठी काम करेल.
उदयकाळ फाउंडेशनचे मार्गदर्शक मा. श्री. राम माने सर यांनी महिलांना मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टिकोनातून शिक्षण हे खुप गरजेची आहे. महिलेने स्वयंरोजगार करावा यासाठी जी काही मदत लागेल ती मदत उदयकाळ फाउंडेशनच्या वतीने करण्यात येईल. पुढील काळात संस्थेच्या माध्यमातून जागतिक महिला दिन उपक्रम, एकल महिलांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शैक्षणिक उपक्रम, स्वयंरोजगारासाठी शिबिर, महिलांच्या आरोग्यासाठी मोफत आरोग्य सेवा, वार्षिक सहल असे विविध उपक्रम राबवण्याचे ठरविले आहे.
या कार्यक्रमात प्रसंगी पुणे शहरातील विविध विभागातून जवळपास ११० महिला भगिनी उपस्थित होते. प्रत्येकाला ओळखपत्र हे वाटप करण्यात आले ओळखपत्राचा उपयोग संघटन म्हणून एकत्रितपणे महिलांच्या अधिकार व हक्कासाठी करण्यात येणार आहे. कार्यक्रमात उपस्थित मान्यवर व सर्व एकल महिला ताईंचे सौ. आरती मयुर बागुल यांनी आभार मानले.