औरंगाबाद: कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीचा व्हिडिओ त्यांनी स्वतः प्रसिद्ध केला आहे.
महाराष्ट्रातील भाजपचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे हर्षवर्धन जाधव हे जावई आहेत. ते यापूर्वी मनसे व शिवसेनेच्या तिकिटावर आमदार झाले आहेत. औरंगाबादेत 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ते अपक्ष उभे होते. ते अपक्ष उभे राहिल्याने चार वेळा खासदार राहिलेल्या शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांना पराभूत व्हावे लागले. यावेळी ते कन्नड विधानसभा मतदारसंघातून पराभूत झाले.
लॉकडाऊनच्या काळात हर्षवर्धन जाधव यांनी आधात्मिक वाचनाचा छंद जोपासला. हे वाचन केल्यानंतर माणूस विनाकारण पळत राहतो. याची जाणीव त्यांना झाली. त्यामुळे मी राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेत असल्याचे जाहीर केले. माझ्या राजकारणाचा उत्तराधिकारी ही माझी पत्नी सौ. संजना जाधव ही असेल असे हर्षवर्धन जाधव यांनी जाहीर केले आहे.
लोकांना जे काही प्रश्न व अडचणी असतील, त्या सोडवून घेण्यासाठी लोकांनी सौ. संजना जाधव यांच्याशी संपर्क करावा, अशी विनंती जाधव यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केली आहे. यासंदर्भात जाधव म्हणाले की, प्रत्येक घरात कुरबुरी होत असतात. आमच्याही घरात कुरबुरी झाल्या, याचा अर्थ असा नव्हे, की वेगळ्या प्रकारच्या गोष्टी घडत असतील. असो… पुढील काळात निश्चितपणे मी सुद्धा सौ. संजना जाधव यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असेल. माझ्या वडिलांचे आशीर्वाद आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली संजना जाधव या उत्कृष्ट भरारी घेतील, याबद्दल माझ्या मनात शंका नसल्याचे जाधव यांनी सांगितले.
कृपया राजकीय, सामाजिक किंवा शासकीय कामासाठी यापुढे सौ. संजना जाधव यांच्याशी थेट संपर्क साधावा. त्या सर्वांचे फोन घेतात. तसेच मी सुद्धा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचेही हर्षवर्धन जाधव यांनी म्हटले आहे.