# विदर्भासह मध्यमहाराष्ट्र, मराठवाड्यातही उष्णतेची तीव्र लाट; अवकाळी पावसाची शक्यता.

 

पुणे: राज्यातील विदर्भात सूर्य आग ओकत असून, कमाल तापमानाचा पारा 45 अंशाच्या पुढे असल्याने त्या भागात तीव्र उष्णतेच्या लाटेने हाहाकार निर्माण केला आहे. तर मध्यमहाराष्ट्र व मराठवाडा उष्णतेच्या झळांनी होरपळला आहे. एरवी चाळीशी देखील न गाठणारे पुणे, सोलापूर, सांगली, सातारा या शहरांच्या तापमानाने चाळीशीचा उंबरठा ओलाडला आहे. उष्णतेच्या लाटेची ही स्थिती अजून किमान तीन दिवस राहिल. त्यानंतर अवकाळी पाऊस बरसणार आहे. असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. तर मंगळवारी राज्यात सर्वात अधिक तापामान नागपूर शहराचे  46.8 अंश सेल्सिअस नोंदले गेले आहे.

उत्तर भारतातील राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये गेल्या चार दिवसांपासून तीव्र उष्णतेची लाट सुरू आहे. कोरडे हवामान आणि उत्तरेकडून राज्याकडे वाहत असलेले उष्णवारे यामुळे राज्यात गेल्या चार दिवसांपासून उष्णतेची लाट आली आहे. ही लाट आता आणखी तीव्र होऊ लागली असून, विदर्भाला या लाटेचा सर्वात जास्त फटका बसणार आहे. येत्या तीन दिवसात विदर्भात अतितीव्र उष्णतेची लाट येणार आहे. तर मध्यमहाराष्ट्र आणि मराठवाड्यात तीव्र उष्णतेची लाट राहणार आहे.

अवकाळी पावसाची शक्यता:
राज्यात गेल्या तीन आठवड्याहून अधिक काळ अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून हा पाऊस थांबल्यामुळे उष्णतेची लाट आली. आता ही लाट तीन दिवसांनंतर कमी होणार आहे. त्यानंतर पुन्हा अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसासाठी आवश्यक असलेली स्थिती सध्या तयार झाली आहे. अरबी समुद्रात दक्षिणपूर्व भागात चार दिवसांपासून चक्रीय स्थिती आहे. तर दक्षिण छत्तीसगडपासून ते तामिळनाडूपर्यंत द्रोणीय स्थिती तयार झाली आहे. ही स्थिती सध्या तेलंगणा पार करून रॉयलसिमापर्यंत पोहचली आहे.  या स्थितीमुळे पुन्हा एकदा राज्यात अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे.

राज्यात मंगळवारी नोंदलेले कमाल तापमान पुढीलप्रमाणे:
मध्य महाराष्ट्र:  पुणे- 37.6, लोहगाव-39.1, जळगाव-44.7, कोल्हापूर- 36.1, महाबळेश्वर-31.2, मालेगाव-44.6, नाशिक -37.5, सांगली-38.4, सातारा -38.8, सोलापूर-44.6
कोकण:  मुंबई- 34.8, सांताक्रझ- 36.2, अलिबाग-36.2, रत्नागिरी -34.8, डहाणू -34.7
मराठवाडा:  औरंगाबाद- 43.5, परभणी-45.5, नांदेड-45.5,            विदर्भ:  अकोला-46.5, अमरावती-45.6. ब्रम्हपुरी-43.9. चंद्रपूर-45.2, गोंदिया -45, वाशिम-43.8, वर्धा- 46, नागपूर- 46.8

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *