पुणे: अरबी समुद्रात तयार झालेले निसर्ग चक्रीवादळ बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अलिबागला धडकले. त्यानंतर संपूर्ण कोकण किनारपट्टीसह मुंबई, ठाणे, पालघर, उत्तर मध्यमहाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यात मुसळधार पावसाने तांडव घातले. किनारपट्टीच्या भागात वेगाने वारे वाहिल्यामुळे प्रचंड झाडे पडल्याच्या घटनांबरोबरच घरांचेही मोठे नुकसान झाले.
दरम्यान, हे चक्रीवादळ मालेगावमार्गे पुढे गुजरात आणि मध्यप्रदेशाकडे गुरूवारी सरकणार आहे. परिणामी राज्यातील पावसाचा वेग कमी होणार असून, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी या भागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
अरबी समुद्रात दोज जून रोजी तयार झालेले निसर्ग चक्रीवादळ ताशी सुमारे 100 ते 110 किमी. वेगाने तीन जून रोजी दुपारी दीड वाजण्याचा सुमारास अलिबागला धडकले. या चक्रीवादळाने कोकणच्या किनारपट्टीवरील सर्व भागात अक्षरक्ष: तांडव घातले. त्यामुळे या भागातील मोठी झाडे रस्त्यावर उन्मळून पडली, तर घरावरील पत्रे पत्त्यासारखी उडून गेली. त्यामुळे त्या भागातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. वादळी वारे आणि पावसाचे रौद्र रूप या भागात पाहण्यास मिळाले. दरम्यान, पुढील काही तासात या चक्रीवादळाची तीव्रता कमी होऊन गुजरात, तसेच मध्य प्रदेशकडे झुकणार आहे. यामुळे राज्यातील मुसळधार पावसाचा जोर कमी होणार आहे.
मान्सूनची आगेकूच सुरूच:
अरबी समुद्रात तयार झालेल्या निसर्ग चक्रीवादळाने हवेतील सर्व आर्द्रता खेचून घेतली होती. परिणामी केरळपासून तामिळनाडूपर्यंत वेगाने झेपावलेला मान्सून मंगळवारी आहे त्याच ठिकाणी थांबला होता. आता या चक्रीवादळाचा वेग कमी झाला असून, ते जमीनीकडे सरकले आहे. त्यामुळे पुन्हा मान्सूनची आगेकूच होण्यास सुरूवात झाली आहे. बुधवारी मान्सूनची आगेकूच सुरूच आहे.