मान्सूनची वाटचाल दमदार; दक्षिण अरबी समुद्र, मालदीव, लक्षव्दीप बेटांसह दक्षिण बंगालचा उपसागर व्यापणार
पुणे: गेल्या अनेक दिवसांपासून अनुकूल स्थिती अभावी एकाच ठिकाणी मुक्काम ठोकून असलेल्या मान्सूनचा आता पुन्हा एकदा गती मिळाली आहे. येत्या 48 तासात मान्सून दक्षिण अरबी समुद्र, मालदीव, कोमोरीन, लक्षव्दीप बेटे आणि आसपासच्या भागासह दक्षिण बंगालचा उपसागर व्यापणार आहे. मान्सूनची आगेकूच सुरू होण्यास अनुकूल स्थिती अल्याने पुढील पाच दिवस केरळ, आसाम, कर्नाटक, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, तेलंगण, आंध्रप्रदेश या भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडणार आहे. याबरोबरच राज्यातील कोकण, मध्यमहाराष्ट्र या भागात तुरळक तर मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावणार आहे. असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
गेल्या काही दिवसांपासून अनुकूल स्थितीअभावी मान्सून अंदमान, निकोबार बेटे, बंगालचा उपसागर आणि आसपासच्या भागात रखडला होता. मात्र, बुधवारी मान्सून पुढे सरकण्यास अनुकूल स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे मान्सून पुढे सरकण्यास सुरूवात झाली आहे. या स्थितीमुळे मान्सून केरळच्या किनारपट्टीवर पोहचण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, राज्यातील बहुतांश शहरांच्या कमाल तापमानात सरासरीपेक्षा तीन ते चार अंशांनी घट झाली आहे. तर बुधवारी राज्यात चंद्रपूर शहराचे तापमान 43.4 अंश सेल्सिअस एवढे नोंदले गेले असून, ते सर्वाधिक आहे. 30 मे पर्यंत राज्यात बहुतांश ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे.