पुणे: उत्तर महाराष्ट्रच्या किनारपट्टीपासून ते उत्तर केरळपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. या क्षेत्राचा प्रभाव दक्षिण गुजरात ते कर्नाटकच्या किनारपट्टीपर्यंत आहे. तसेच उत्तर प्रदेशपासून ते पूर्व विदर्भापर्यंत चक्रीय स्थिती आहे. या दोन्ही स्थिती पाऊस पडण्यास पोषक आहेत. परिणामी 5 ते 7 जुलै दरम्यान कोकण, मध्यमहाराष्ट्र आणि विदर्भाच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस पडणार आहे. तर मराठवाड्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे.
मराठवाड्यात मागील महिन्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. मात्र, उर्वरित भागात पावसाने दडी मारली होती. जुलै महिन्याच्या पहिल्या टप्प्यापासून कोकणासह मध्यमहाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार ते अतिवृष्टी या प्रमाणात पावसाने हजेरी लावण्यास सुरूवात केली आहे. असाच मुसळधार पाऊस 5 ते 7 जुलैपर्यंत राहणार आहे. त्यातही मध्यमहाराष्ट्रातील घाटमाथ्यावर पावसाचा जोर चांगला राहिल. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक पुणे (घाटमाथा) या भागात हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला. तर कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात मुसळधार ते अतिवृष्टी आणि मराठवाडा भागात मध्यम पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आहे.