12 जुलैपर्यंत पावसाचा जोर राहणार
पुणे: जुलै महिन्याच्या सुरूवातीपासूनच राज्यात हळूहळू पावसाने पकडलेला जोर अजूनही सुरूच असून, राज्याच्या सर्वच भागात सध्या ‘कोसळधारा’ कायम आहेत कोकण व मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर अतिअवृष्टी, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पाऊस 12 जुलैपर्यंत सुरूच राहणार आहे. दरम्यान, कोकण किनारपट्टीवर जोरदार पावसाबरोबरच सोसाट्याचा वारा तर विदर्भात विजांचा कडकडाट, मेघगर्जना वाढणार आहेत, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
राज्यात गेल्या आठवडाभरापासून पाऊस हजेरी लावत आहे. मात्र, पहिल्या टप्प्यात पावसाचा जोर सर्वच भागात कमी होता. मात्र हळूहळू पावसाने जोर धरण्यास सुरूवात केली. त्यातही कोकणात पावसाने धुमाकूळ घालण्यास केलेली सुरूवात आजही कायम आहे. मध्यमहाराष्ट्राच्या काही भागात पहिल्या टप्प्यात पाऊस कमी बरसला मात्र गेल्या काही दिवसांपासून याही भागात पावसाने चांगली हजेरी लावण्यास सुरूवात केली आहे. विदर्भात जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच पाऊस बरसत आहे. तर मराठवाड्यात जून महिन्यापासून टप्प्याटप्प्याने पाऊस बरसत आहे. आता मात्र राज्यात सर्वदूर पाऊस हजेरी लावत आहे.
हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार गुजरातच्या किनारपट्टीपासून ते कर्नाटकच्या किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. तर मध्यपूर्व बंगालच्या उपसागरापासून ते दक्षिण ओडिशा, उत्तर आंध्र प्रदेशची किनारपट्टी या भागात चक्रीय स्थिती कायम आहे. या दोन्ही स्थितीमुळे अरबी समुद्राकडून राज्याकडे बाष्पयुक्त वारे वाहत आहेत. यामुळे कोकण, मध्यमहाराष्ट्रील घाटमाथा आणि मराठवाडा व विदर्भ या भागात पावसाने जोर पकडल आहे. दरम्यान, पावसाचा हा जोर 12 जुलैपर्यंत कायम राहणार आहे.