# राज्यात सर्वदूर कोसळधार; मुंबईत एकाच दिवशी 270 मिमी.

पुणे:  राज्यात दोन दिवसांपासून सर्वदूर मुसळधार पाऊस सुरू असून, 5 आणि 6 ऑगस्ट रोजी कोकण व मध्यमहाराष्ट्राच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस पडेल. तर मराठवाडा आणि विदर्भात सुरू असलेला पाऊस 6 ऑगस्टनंतर कमी होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, मुंबईत एकाच दिवशी 270 मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याने रस्ते जलमय झाले होते.

बंगलाच्या उपसागरासह बांग्लादेशच्या किनारपट्टीवर  गेल्या चार दिवसांपासून तयार असलेला कमी दाबाचा पट्टा कायम असून, त्याची तीव्रता वाढली आहे. तसेच दक्षिण गुजरात आणि आसपासच्या भागात चक्रीय स्थिती असून, त्याची तीव्रता जास्त आहे. या दोन्ही स्थितीच्या परिणामामुळे राज्यात सर्वदूर पाऊस होत आहे. विशेषत: कोकणात मुसळधार तर मध्यमहाराष्ट्राच्या बहुतांश भागात मुसळधार तर उर्वरित भागात जोरदार पाऊस पडत आहे. या शिवाय घाटमाथ्यावरील काही भागात अतिवृष्टी सुरू आहे.

गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात सातत्याने मुसळधार पाऊस सुरू आहे. हा पाऊस आणखी दोन दिवस कायम राहणार आहे. तर विदर्भातील पावसाची असलेली गती आता कमी होण्याची शक्यता आहे. असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, कोकणात चार दिवस, मध्यमहाराष्ट्रात दोन दिवस, मुसळधार पाऊस राहिल. तर मराठवाडा व विदर्भात मध्यम स्वरूपाचा पाऊस राहिल.

राज्यातील पालघर, मुंबई, ठाणे, पुणे, रायगड, नाशिक  या भागात 5 व 6 ऑगस्ट रोजी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे, तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली आणि औरंगाबाद या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

राज्यात चोवीस तासात पडलेला पाऊस (मिमीमध्ये):

मुंबई-270, रोहा- 200, भिरा, वसई-170, माणगाव, रत्नागिरी, पाली- 160, दापोली, गुहानगर संगमेश्वर, सांवतंवाडी-140 प्रत्येकी. चिपळूण, ठाणे, उरण, वेंगुर्ला -130 प्रत्येकी. बेलापूर, राजापूर-120 प्रत्येकी. कुडाळ, खेड, महाड-100 प्रत्येकी, महबळेश्वर -190, गगनबावडा- 150, चंदगड, राधानगरी,-90 प्रत्येकी, लोणावळे, वेल्हे-150, माहुर-20, आरमोरी-70, ब्रम्हपुरी, भामरागड-50 प्रत्येकी.
घाटमाथा: ताम्हीणी-210, डोंगरवाडी-180, दावडी-160,   शिरगाव, कोया, 130 प्रत्येकी, खोपोली- 90, लोणावळा-80 मिलिमीटर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *