पुणे: गेल्या काही दिवसांपासून थांबलेला पाऊस आता पुन्हा सुरू होणार आहे. मध्यमहाराष्ट्रासह मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावणार आहे. कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, बीड, लातूर, उस्मानाबाद, नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील तीन दिवस पडेल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. दरम्यान, विदर्भाच्या काही भागात तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे.
राज्यात मान्सून दाखल झाल्यानंतर एक दोन दिवस संपूर्ण राज्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. त्यानंंतर मान्सून उत्तरेकडे सरकला असून, सध्या मान्सून मध्यप्रदेश, झारखंड, राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर आणि अरूणाचल प्रदेश या भागापर्यंत पोहचला आहे. मात्र, मान्सून पुढे गेल्यानंतर गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे कमाल तापमानात वाढ होऊन उकाड्यात वाढ झाली होती. गेल्या दोन दिवसांपूर्वी दक्षिण गुजरात आणि आसपासच्या भागावर असलेली चक्रीय स्थिती आता अरबी समुद्र आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर असून, त्याचा प्रभाव वाढला आहे. त्यामुळे मध्यमहाराष्ट्र आणि मराठवड्यात पुढील तीन दिवस मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.