# हेमराज बागुल यांनी मराठवाडा विभाग माहिती संचालकपदाचा पदभार स्वीकारला.

औरंगाबाद: माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या मराठवाडा विभागाचे संचालक म्हणून हेमराज बागुल यांनी आज शुक्रवारी अतिरिक्त कार्यभार स्वीकारला. श्री. बागुल हे सध्या नागपूर-अमरावती विभागाचे माहिती संचालक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.

यापूर्वी मराठवाडा विभागाच्या माहिती संचालकपदाची सूत्रे राधाकृष्ण मुळी यांच्याकडे होती. त्यांच्या निवृत्तीमुळे दि.31 मे 2021 रोजी हे पद रिक्त झाले होते. खडकेश्वर येथील संचालक कार्यालयात आज हेमराज बागुल यांचे जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी सहायक संचालक प्रमोद धोंगडे, माहिती अधिकारी वंदना थोरात, सहायक संचालक मीरा ढास, माहिती सहायक संजीवनी जाधव पाटील, श्याम टरके, रेखा पालवे आदींसह सर्व कर्मचारी उपस्थित होते.कार्यभार स्वीकारल्यानंतर श्री.बागुल यांनी मराठवाडा विभागातील आठही जिल्हा माहिती अधिकाऱ्यांशी दुरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधून कामकाजाचा आढावा घेतला.

श्री.बागुल यांनी यापूर्वी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांचे मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून तसेच महासंचालनालयातील लोकराज्य, महान्यूज, वृत्त शाखा आदी विभागात विविध महत्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे संचालकपदी सरळ सेवेने थेट निवड करण्यात आलेले ते या विभागातील पहिलेच संचालक आहेत. प्रशासनात येण्यापूर्वी त्यांनी पत्रकारितेतही लक्षणीय योगदान दिले असून त्यासोबत विविध साहित्यिक-सांस्कृतिक उपक्रमातही ते सक्रीय असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *