पुणे: पती पत्रकार, ती केईएम हाॅस्पिटलमध्ये कोविड वाॅर्डमध्ये रूग्णांच्या सेवेत. त्यामुळे दोघेही कर्तव्य बजावण्यासाठी घराबाहेर. घरी दोन मुलं. नोकरी सांभाळून घरचं बघायचं म्हणजे खरं तर ही तारेवरची कसरत. अशा या कोरोना योद्धा संतोषी शिवाजी शिंदे यांचा सन्मान केला आहे कर्तव्य फाउंडेशनने…
कर्तव्य फाउंडेशनतर्फे केईएम रूग्णालयातील स्टाफ नर्स सौ. संतोषी शिवाजी शिंदे यांना कोरोना योध्दा सन्मानाने गौरविण्यात आले. फाउंडेशनचे अध्यक्ष विकास भांबुरे यांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह व शाल देऊन गौरविण्यात आले. यावेळी फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अशोक देशमुख, राजाभाऊ चव्हाण, पत्रकार शिवाजी शिंदे आदी उपस्थित होते. सौ.संतोषी शिंदे या केईएम. रुग्णालयात स्टाफ नर्स या पदावर कार्यरत असून गेल्या चार महिन्यापासून त्या कोविड वाॅर्डमध्ये सेवाकार्य करीत आहेत. त्यांच्या या सेवाकार्याची दखल घेऊन त्यांचा सन्मान केला असल्याचे यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष विकास भांबुरे यांनी सांगितले.