औरंगाबाद: डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरात कोविड-19 संशोधन केंद्रास (Covid-19 Testing & Research Facility Center) ‘आयसीएमआर’ची अंतिम मंजुरी प्राप्त झाली आहे. कोरोना टेस्टींग सोबतच या आजाराचे संशोधनही या केंद्रात तातडीने सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिली.
औरंगाबाद शहरात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने कोरोना टेस्टींग सेंटर केव्हा सुरू होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. यासंदर्भात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान नागपूर (AIIMS) यांच्यावतीने मंजुरी देण्यात आल्याचे पत्र शुक्रवार, तीन जुलै रोजी प्राप्त झाले. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) यांच्या वतीने ‘एम्स’ला कोरिना टेस्टिंगलॅब सुरू करण्यास मान्यता देणे बाबतचे अधिकार देण्यात आले आहेत. लॅबचे संचालक डॉ. गुलाब खेडकर व सहकाऱ्यांनी यासाठी आवश्यक ती तयारी करून मान्यता मिळण्यासाठी पाठपुरावा केला. ‘एम्स’च्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. मीना मिश्रा व सहकाऱ्यांनी विद्यापीठातील उपलब्ध असलेले कुशल मनुष्यबळ पायाभूत सुविधा यंत्रसामुग्री या संबंधीची संपूर्ण पाहणी करून अहवाल सादर केला होता. त्यानंतर टेस्टिंग सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे. या संशोधन केंद्रास लवकरच ‘नॅशनल अॅक्रीडिटेशन बोर्ड फॉर टेस्टींग अॅण्ड कॅलीब्रेशन लॅबोरेटरीज’ यांच्यावतीने अधिस्वीकृतीचे पत्रही मिळणार आहे. या केंद्रात अगोदरच टेस्टिंगचे काम सुरु करण्यात आलेले आहे. आता मान्यता मिळाल्याने हे काम गतीने होणार आहे. दरम्यान, या केंद्रात दररोज एक हजार स्वॅब तपासणी करता येईल. दरम्यान, संशोधन केंद्राच्या इमारतीविषयीमाहिती देताना डॉ खेडकर यांनी सांगितले की, कोविड-19 विषाणूच्या संशोधनाकरिता हे केंद्र राज्यातील तिसरे केंद्र असून या संशोधन केंद्रांत सध्या २३ कर्मचाऱ्यांचा स्टाफ असून येथे दररोज 1 हजार पर्यंत स्वॅब तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे.