पुणे: खाजगी वाहतूकदारांकडून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या भाडे दराच्या दीडपटीपेक्षा जास्त भाडेदर आकारल्यास पुराव्यासह तक्रार नोंदवता येणार आहे.
सणउत्सवाच्या कालावधीत खाजगी प्रवासी बसेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून अवाजवी जादा भाडे आकारण्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे त्या संवर्गातील टप्पा वाहतुकीचे भाडेदर विचारात घेवून खाजगी कंत्राटी परवाना वाहनाचे त्या संवर्गासाठी संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रति किमी भाडेदराच्या 50 टक्के पेक्षा अधीक राहणार नाही अशाप्रकारे भाडे आकारणी करण्याचे निर्देश खाजगी वाहतुकदारांना देण्यात आले आहेत.
खाजगी वाहतूकदारांकडून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या भाडे दराच्या दीडपटीपेक्षा जास्त भाडेदर आकारल्यास पुराव्यासह dycommr.enf2@gmail.com व mh14@mahatranscom.in या ईमेल पत्त्यावर तक्रार नोंदवावी. अवाजवी भाडे आकारणी करणाऱ्या खाजगी वाहतूकदारावर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकांना आदेश देण्यात आल्याचे पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी कळविले आहे.