पंतप्रधानांचे मन की बात कार्यक्रमात प्रतिपादन; बीड पोलीस दलातील श्वान रॉकीचा आवर्जून उल्लेख
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या ‘मन की बात’ कार्यक्रमात सोफी आणि विदा या भारतीय लष्करातील ‘चीफ ऑफ आर्मी स्टाफ कंमेंडेशन कार्डस’ या पुरस्काराने सन्मानित श्वानांचा उल्लेख केला.
पंतप्रधान म्हणाले, आपल्या लष्करामध्ये, आपल्या सुरक्षा दलांकडे, असे कितीतरी बहादूर श्वान आहेत त्यांनी अनेक बॉम्बस्फोट आणि दहशतवादी कारवायांना रोखण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. आयईडी आणि दारुगोळा शोधून काढल्याची त्यांनी अनेक उदाहरणे दिली. बीड पोलिसांनी साथीदार सदस्य श्वान रॉकी याला संपूर्ण सन्मानाने अखेरचा निरोप दिला, रॉकीने 300 पेक्षा अधिक गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना मदत केली होती, याचादेखील पंतप्रधानांनी उल्लेख केला.
स्थानिक प्रजातीच्या श्वानांबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले, त्यांच्या पालनासाठी येणारा खर्च कमी आहे आणि ते भारतीय वातावरणात सामावले जातात. सुरक्षा संस्था स्थानिक प्रजातीच्या श्वानांना आपल्या सुरक्षा पथकात समाविष्ट करत आहेत. भारतीय कृषी संशोधन संस्थेने स्थानिक प्रजातीचे श्वान अधिक चांगले आणि लाभदायक ठरण्यासाठी त्यावर संशोधन केले आहे. त्यांनी श्रोत्यांना एक तरी स्थानिक प्रजातीच्या श्वानाचे पालन करावे, यासाठी प्रेरित केले.