हैदराबाद: तेलंगणाच्या एका वरिष्ठ पोलीस अधीक्षकांवर एसीबी म्हणजेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा छापा पडला आहे. एसीबीने सहायक पोलीस आयुक्त येल्माकुरी नरसिम्हा रेड्डी यांच्याविरोधात प्रमाणाबाहेर अधिक संपत्ती जमा केल्यासंदर्भात गुन्हा दाखल केला आहे. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील काही ठिकाणी छापे टाकले आहेत.
या छाप्यांमधून ही बाब समोर आली आहे की, त्यांनी वैध मार्गांनी होणाऱ्या संपत्तीहून अधिक संपत्ती ही बेकायदेशीररित्या आणि संदिग्ध पद्धतीने जमा केली आहे. यापद्धतीने तब्बल 70 कोटीची अवैध संपत्ती या पोलीस अधीक्षकाने जमा केल्याची माहिती समोर आली आहे. रेड्डी हे मलकानगिरी विभागात सहायक पोलीस आयुक्त म्हणून रुजू आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एका प्रेस रिलीजच्या माध्यमातून जाहीर केलं आहे की, या अवैध संपत्तीची सरकारी किंमत 7.5 कोटी रुपये असली तरी स्थानिक बाजारात त्याची किंमत 70 कोटीपर्यंत जाते. ही सर्व कारवाई एका गुपित माहितीच्या आधारे केली गेली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तेलंगणा राज्यात हैदराबाद, वारंगल, जनगांव, नालगोंडा, करीमनगर जिल्हा आणि आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यात जवळपास 25 ठिकाणी छापे मारले आहेत. या तपासात अनंतपूर मधील 55 एकरची शेतीयोग्य जमीन, मधेपूरमध्ये सायबर टॉवर्सच्या समोर एक मोठी जमीनीचा प्लॉट, हफिजपेटमध्ये आणखी दोन जमीनीचे प्लॉट, एक कमर्शियल G 3 बिल्डींग, दोन घर, 15 लाख बँक बँलंस, दोन बँक लॉकर, रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक आणि इतर काही व्यवसायांची माहिती मिळाली आहे. विभागाने सांगितलं आहे की, या प्रकरणी अजून तपास सुरु आहे.