मनोविकास प्रकाशनाच्या फेसबुक लाईव्हवर वाचकांशी संवाद
पुणे: मी कुठलाही धर्म मानत, जात मानत नाही. धर्मातल्या रुढी, परंपरा मी मानत नाही त्यामुळे मी अंधश्रद्ध नाही. याचं कारण छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद आणि स्वातंत्र्यवीर सावरकर या तिघाही महामानवांच्या विचारांचा माझ्यावर प्रभाव आहे. परंतु या तिघांकडेही धर्माच्या चष्म्यातून पाहिलं जात असल्याने अनेकांचं त्यांच्या मूळ विज्ञानवादी, विवेकी विचारांकडे दुर्लक्ष होतं असं माझं मत आहे. असं सारं असलं तरी मी नशिब मानतो, पण तरीही मी विज्ञानवादी आहे, अशी विविध मतं व्यक्त करत प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले यांनी मनोविकास प्रकाशनाच्या फेसबुक लाईव्हवर वाचकांशी संवाद साधला.
नशिबाचा मुद्दा अधिक स्पष्ट करताना ते म्हणाले, “आपल्या आयुष्यात घडणाऱ्या, आपल्या भोवताली घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण असतं. हा कार्यकारण भाव आपल्याला विज्ञान सांगतं. त्यामुळे कुठलीच गोष्ट विनाकारण घडत नाही. परंतु काही गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेरच्या असतात. त्या आपण टाळू शकत नाही. अशा अनियंत्रित कारणांमुळे आपल्या बाबतीत जेव्हा काही घडतं त्याला मी नशिब मानतो. म्हणजे आपण रस्त्याच्या एका कडेने अगदी शिस्तीत चाललेलो असतो आणि अचानक कोणीतरी पुढून भरधाव गाडीने येतो आणि आपल्याला उडवतो. आपली काही चूक नसताना जेव्हा अशा अपघाताला आपल्याला सामोरं जावं लागतं तेव्हा तो नशिबाचा भाग आहे असं मला वाटतं.”
पुढे ते म्हणाले, “अर्थात याचा अर्थ मला देव, धर्म अशा साऱ्या गोष्टी मान्य आहेत असं मात्र अजिबात नाही. कुठलाही धर्म मला मान्य नाही आणि कुठलाही देव मला मान्य नाही. मी पूर्णपणे विज्ञानवादी आहे. माझ्या दृष्टीने माणूसकी हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे. स्वामी विवेकानंद, सावरकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्येही मला ही भूमिका दिसते. सावरकर तर प्रखर विज्ञाननिष्ठ होते. त्यांनी गाय हा उपयुक्त पशू आहे असं म्हटलेलं आहे. कुठलीही अंधश्रद्धा त्यांनी बाळगली नाही. जातीनिर्मूलनाचं त्यांनी काम केलं आहे. परंतु आपल्याकडे अशा बहुतांश व्यक्तींकडे धर्माच्या नजरेनं पाहिलं जातं आणि ही धर्मभेदाची, जातीभेदाची जी वृत्ती आहे ती इंग्रजांनी आपल्यामध्ये भिनवली आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.”
आयआयटीचे केमिकल इंजिनिअर असलेले आणि सॉफ्टवेअरच्या क्षेत्रात मोठी कामगिरी केलेले अच्युत गोडबोले यांनी लेखक म्हणून खूप वेगवेगळे विषय हाताळले आहेत. अनेक विज्ञान शाखांमधून त्यांनी या लेखनाच्या निमित्ताने लिलया संचार केलेला पाहायला मिळतो. यावरून त्यांच्या लिखानाचं जेवढं कौतुक होतं तेवढीच त्यांच्यावर टिकाही केली जाते. त्याबद्दलही त्यांनी यावेळी अत्यंत मोकळेपणाने मतं मांडली. ते म्हणाले, “मी कुठल्याही विषयातला तज्ज्ञ नाही. माझा तसा दावाही नाही. आणि हो मी विविध ठिकाणचे संदर्भ वापरून लेखन करतो. त्यात मला काही गैर वाटत नाही. याचं कारण मला वाटतं की, मला जे समजलं आहे ते इतरांनाही समजलं पाहिजे. मराठी वाचकांना विशेषकरून जगभरातलं जे ज्ञान आहे ते त्यांच्या समोर ठेवलं पाहिजे. त्यातून आपली मराठी ही ज्ञानभाषा झाली पाहिजे. याच भूमिकेतून मी आजवर लिखान करत आलो आहे. आणि ते करताना मी स्वतःला सतत विद्यार्थ्याच्या भूमिकेत ठेवलं आहे. मला नवं नवं सतत शिकायला आवडतं. वाचायला आवडतं. त्यातून मी वाचत असतो. अनेक इंग्रजी पुस्तकं मी गोळा करतो. त्यातून विविध विषयाशी संबंधीत काही संदर्भ असतील तर ते घेतो. त्यातून जे आकलन मला झालेलं असतं ते मराठी वाचकांसमोर ठेवण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याच प्रयत्नातून आजवर ३५ हून अधिक ग्रंथ लिहिले. विशेष म्हणजे यातले बहुतेक ग्रंथ वाचकांच्या पसंतीस उतरले. त्याच्या तीन ते पाच, सात अशा आवृत्त्या निघाल्या, हजारोच्या संख्येत त्या पुस्तकांच्या प्रती विकल्या गेल्या आहेत. त्यामुळे कोण काय म्हणतं याकडे लक्ष न देता मी माझं काम करत राहतो, असंही ते म्हणाले.
ज्येष्ठ संवादक, लेखक, पत्रकार समीरण वाळवेकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला. मनोविकासचे संपादक विलास पाटील यांनी प्रास्ताविक केले.