बीड: बीड शहरात विविध ठिकाणी कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे शहरातील १४ ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून अनिश्चित कालावधीसाठी फौजदारी प्रक्रिया दंड संहिता १९७३ चे कलम १४४ (१)(३) नुसार पूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे, असे आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दिले आहेत.
याबाबतचा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी बीड यांनी दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यात इतर ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक व्यवस्था कार्यरत करणे आवश्यक आहे.
बीड शहरातील शिवाजी नगर, स्वराज्य नगर, रहेमतनगर, धानोरा रोड (पाबळे क्लिनीक पासूनचा परिसर) कॅनरा बँक कॉलनी, कालीका नगर, अक्सा कॉलनी (शहेनशहा नगर), शहंशाहनगर, अजीजपुरा (काली मस्जिद), विद्या नगर पूर्व, गजानन कॉलनी (शाहूनगर), आदित्य नगरी, एमएससीबी समोरची माळवेस आणि कबाड गल्ली या भागातील संबंधित परिसरात कंटेन्मेंट झोन (Containment Zone) म्हणून घोषित करण्यात आले आहे, असे आदेशात नमूद केले आहे.
तसेच सर्व संबंधित ठिकाणी अनिश्चित काळासाठी बंद करण्यात येवून पूर्णवेळ संचारबंदी लागू करण्यात आली आहेत. राज्य शासनाने लाॅकडाऊन कालावधी ३१ जुलैपर्यंत वाढविला असल्याने त्याअनुषंगाने जिल्ह्यात दिनांक 31 जुलै २०२० रोजीच्या रात्री १२ पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता कलम (१) (३) लागू करण्यात आले आहे.