# नांदेडमध्ये गुंडांनी गोळीबार करून व्यापाऱ्यास लुटले; एक जखमी.

नांदेड: गेल्या काही महिन्यांपासून शहर व जिल्ह्यात गुंडांचा धुमाकूळ सुरु असून पोलीस यंत्रणेला एक दोन नव्हे तर अनेकवेळा या गुडांनी आव्हान दिले आहे. नवे पोलीस अधीक्षक रुजू होऊन काही दिवस झाले नाही तोच रविवारी सायंकाळी शहरातील जुना मोंढा भागात दोन दुचाकीवरुन आलेल्या सहा गुंडांनी गोळीबाराच्या आठ फैरी झाडून प्रचंड दहशत निर्माण केली. तसेच एका व्यापाऱ्याकडून दहा हजार रुपये लुटले आणि जाताना केलेल्या गोळीबारात पानपट्टी चालक तरुण जखमी झाला.

जुना मोंढा भागात मनपाचे महाराजा रणजितसिंघ मार्केट आहे. या मार्केटमध्ये कापड दुकाने आहेत. मर्चंट बँकेच्या गल्लीतील या मार्केटमधील पहिल्या मजल्यावर दहा दुकाने आहेत. यात मंगलमूर्ती गारमेंंटस्, विजयालक्ष्मी टेक्सटाईल्स, कृष्णा होजियरी, नरसिंह हॅन्डलूम, शुभम टेक्सटाईलसह अन्य दुकाने आहेत. रविवारी सायंकाळी ५ च्या सुमारास तीन दुचाकीवरुन सहा जण आले आणि काही कळायच्या आत त्यांनी जोरदार फायरिंग करीत दहशत निर्माण केली. नंतर मंगलमूर्तीमध्ये हे गुंड घुसले होते. शेजारच्या विजयलक्ष्मी या दुकानात घुसून दहा हजार रुपये हिसकावले तेथे गोळीबारही केला. कृष्णा होजियरीमध्ये पैसे न मिळाल्याने तेथे झटापट झाली. तेथे दोन राऊंड फायर करीत गुंडांनी पळापळ सुरु केल्यावर भीतीपोटी तेथील पानपट्टी चालक आकाश परिहार आपली टपरी बंद करुन पळत असताना त्याच्या डाव्या अंगाला गोळी लागली. त्यात तो जखमी झाला. हा थरार घडताच पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय पवार, पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे, सपोनि. पठाण, स्थागुशाचे द्वारकादास चिखलीकर व मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला परंतु तोपर्यंत हे गुंड पळून गेले होते. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी महाराजा रणजितसिंघ मार्केटमधील घटनास्थळ असलेल्या दुकानांची पाहणी करीत सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात काही तरुण हातात खंजर व गावठी पिस्तूल घेतलेले दिसून आले. मात्र, त्यांची ओळख पटली नाही.

शहरात गुंडांचा वावर वाढला, वारंवार गोळीबार:  शहरात विशेषत: जुन्या नांदेड भागात गुंडाराज खुलेआम असल्याचा प्रत्यय वारंवार येत आहे. यापूर्वीही काँग्रेस नेते गोविंद कोकुलवार यांच्यावर चौफाळा भागात प्राणघातक हल्ला झाला होता. त्यावेळी गोळीबारात ते गंभीर जखमी झाले होते. तांडा बारच्या मालकावरील गोळीबार हिंगोली गेट भागात झाला होता. आसना पुलावर अर्धापूरवरुन येणाऱ्या सराफा व्यापाऱ्याला लुटले होते. नांदेड ग्रामीण भागातही लुटमार, चाकू हल्ल्याच्या घटना घडल्या होत्या. या प्रकरणानंतर आता जुना मोंढ्यासारख्या गजबजलेल्या व्यापारपेठेत खुलेआम खंजर, पिस्तूल घेऊन गुंडांनी केलेला गोळीबारामुळे व्यापारी वर्गात प्रचंड घबराट निर्माण झाली आहे.

लवकरच गुंडांचा बंदोबस्त करु -पोलीस अधीक्षक:  आपण स्वत: घटनास्थळाची पाहणी केली आहे. घटनेत वापरलेल्या ३ गोळ्यांच्या पुंगळ्या आढळून आल्या. या घटनेमागे जे कोणी असतील त्यांचा कसून शोध घेतला जाईल आणि लवकरच या गुंडांचा बंदोबस्त करु, असे पोलीस अधीक्षक शेवाळे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *