शंकर महादेवन, हेमा मालिनी यांचा ‘गंगा’ बॅले, अशोक हांडे यांचा ‘आजादी का अमृत महोत्सव’, राहुल देशपांडे यांची संगीत मैफिल रंगणार
पुणे: कला, संस्कृती, गायन, वादन, नृत्य, संगीत, क्रीडा यांचा मनोहारी संगम असणारा पुणे फेस्टिव्हल हा सांस्कृतिक महोत्सव यंदा ३४ वे वर्ष साजरे करीत आहे. याचे उद्घाटन शुक्रवार, २ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.०० वाजता केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अध्यक्षतेखाली श्री गणेश कला क्रीडा रंगमंच, स्वारगेट, पुणे येथे होत आहे. या उद्घाटन सोहळ्यात राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री मंगलप्रभात लोढा, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि खा. गिरीश बापट हे प्रमुख पाहुणे आहेत. या सोबतच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील हे देखील या प्रसंगी उपस्थित राहतील. अभिनेते सुनील शेट्टी हे उद्घाटन सोहळ्याची शोभा वाढवतील.
पुण्याचे नाव जागतिक उद्योग नकाशावर नेणारे व पुणे फेस्टिव्हलशी प्रथम वर्षापासून जोडले गेलेले ज्येष्ठ उद्योगपती पद्मभूषण (कै.) राहुल बजाज यांच्या पवित्र स्मृतीस यंदाचा ३४ वा पुणे फेस्टिव्हल अर्पण करण्यात आला आहे अशी माहिती पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी पत्रकार परिषदेत दिली. मुख्य संयोजक डॉ. सतीश देसाई, महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटीयन एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षा आबेदा इनामदार आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या उपसंचालक सुप्रिया करमरकर हे मंचावर उपस्थित होते.
यंदा पुणे फेस्टिव्हलमध्ये भारतरत्न लता मंगेशकर, भारतरत्न पं. भीमसेन जोशी, पद्मविभूषण पं. शिवकुमार शर्मा, पद्मविभूषण अभिनेते दिलीपकुमार आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहणारे कार्यक्रम, ‘ऑल इंडिया मुशायरा, अभिनेत्री नृत्यांगना खा. हेमा मालिनी यांचा ‘गंगा’ बॅले, अशोक हांडे यांचा ‘आजादी ७५ आजादी का अमृत महोत्सव’ कार्यक्रम, शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांची संगीत मैफिल आणि ‘मिस पुणे फेस्टिव्हल’ स्पर्धा हे कार्यक्रम श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे होतील. या शिवाय बालगंधर्व रंगमंदिर व यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. बालगंधर्व कलादालन येथे महिलांची चित्रकला स्पर्धा व प्रदर्शन, पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे उगवते तारे व इंद्रधनू आणि हॉटेल तरवडे क्लर्कस् इन येथे महिलांची पाककला स्पर्धा, जपानी पुष्परचना व मंगळागौरी खेळ या सोबतच पुणे शहरात विविध ठिकाणी क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.
पुणे फेस्टिव्हलच्या पॅट्रन अभिनेत्री नृत्यांगना खा. हेमा मालिनी यंदा उद्घाटन सोहळ्यात गणेश वंदना व दुसरे दिवशी त्यांचा ‘गंगा’ बॅले सादर करणार आहेत. गेल्या ३४ वर्षात सन २००९ मध्ये स्वाईनफ्लू आणि सन २०२० व २०२१ मध्ये कोरोनामुळे पुणे फेस्टिव्हलचे कार्यक्रम झाले नाहीत. उर्वरित ३१ वर्षांमध्ये हेमा मालिनी यांनी तब्बल २९ वर्षे पुणे फेस्टिव्हलमध्ये त्यांचा बॅले अथवा गणेशवंदना अथवा शिवस्तुती सादर केली आहे. त्यांचा नवा बॅले त्या प्रथम पुणे फेस्टिव्हलमध्ये सादर करतात. त्यांच्या कन्या ईशा आणि अहाना यांच्या नृत्य कारकिर्दीची सुरुवातही त्यांनी पुणे फेस्टिव्हलमध्ये केली.
लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेतून सार्वजनिक गणेशोत्सव महाराष्ट्रभर पसरला. त्यापासून प्रेरणा घेऊन १९८९ मध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे तेव्हाचे अध्यक्ष खा. सुरेश कलमाडी यांनी पुणे फेस्टिव्हलची सुरुवात केली. त्यावेळी उद्योगपती राहुल बजाज राज्यसभेचे खासदार होते त्यांचीही मोठी साथ लाभली. खासगी प्रायोजकत्वाद्वारे चालू असलेला सलग १० दिवस व ३४ वर्षे चालू असलेला ‘पुणे फेस्टिव्हल’ हा देशातील मोठा सांस्कृतिक महोत्सव मानला जातो. याला ‘मदर ऑफ ऑल फेस्टिव्हल्स’ ही मानले जाते. भारतरत्न स्वरभास्कर (कै.) पं. भीमसेन जोशी पुणे फेस्टिव्हलचे प्रथमपासून पटून होते.
पुणे फेस्टिव्हल कमिटी, पुणेकर नागरिक महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि भारत सरकारचा पर्यटन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे फेस्टिव्हलचे आयोजन होते. पुणे फेस्टिव्हलचे सर्व कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य असतात. पुणे फेस्टिव्हलच्या श्रीची प्रतिष्ठापना बुधवार, ३१ ऑगस्ट रोजी सकाळी १०.०० वाजता हॉटेल सारस, नेहरू स्टेडीयम येथे पुणे महानगरपालिका आयुक्त सौ. व श्री. विक्रमकुमार आणि पुण्याचे सहपोलीस आयुक्त सौ व श्री. संदीप कर्णिक यांच्या हस्ते विधिवत होईल. यावेळी अभिनेत्री मानसी नाईक उपस्थित राहतील. वेदमूर्ती पं. धनंजय पाटे गुरुजी पौराहित्य करतील. समाजात विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्यांना दरवर्षी ‘पुणे फेस्टिव्हल अवॉर्ड देऊन गौरविण्यात येते. यंदा ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ अँड. एस. के. जैन ज्येष्ठ दिग्दर्शिका पद्मभूषण सई परांजपे, एन. ए. ए. सी. (नॅक) चे चेअरमन डॉ. भूषण पटवर्धन, प्रख्यात शास्त्रीय गायक राहुल देशपांडे आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांना ‘पुणे फेस्टिव्हल अवॉर्ड’ ने उद्घाटन सोहळ्यात गौरवले जाईल ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व सिंबायोसिसचे संस्थापक पद्मभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार यांना या सोहळ्यात ‘जीवनगौरव पुरस्कार’ देऊन गौरवले जाईल.
दरवर्षी प्रमाणे यंदाही सार्वजनिक गणेशोत्सवाची शताब्दी साजरी करणाऱ्या पुण्यातील गणेशोत्सव उद्घाटन सोहळ्यात विशेष सत्कार केला जातो. यंदा नव चैतन्य मंडळ (डेक्कन जिमखाना) आणि राजर्षी शाहू मंडळ (शुक्रवार पेठ) या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा सत्कार करण्यात येणार आहे. पुणे फेस्टिव्हलचे मुख्य प्रायोजक कोहिनूर ग्रुप असून उपप्रायोजक जमनालाल बजाज फाउंडेशन, नॅशनल एग को-ऑर्डिनेशन कमिटी, सिरका आणि सहप्रायोजक भारत फोर्ज व पंचशील आहेत.
भव्य उद्घाटन सोहळा: पुणे फेस्टिव्हलचा उद्घाटन सोहळा देखील दरवर्षी प्रमाणे नेत्रदीपक असेल, ढोल ताशांचा गजरात दीपप्रज्वलन व तुकाराम दैठणकर यांच्या सनई वादनाने कार्यक्रमाची सुरुवात होईल. अभिनेत्री नृत्यांगना हेमा मालिनी गणेश वंदना सादर करून ३४व्या पुणे फेस्टिव्हलच्या उद्घाटन सोहळ्याच्या सांस्कृतिक कार्यक्रमांची सुरुवात करतील. ज्येष्ठ गायक शंकर महादेवन यांच्या नव्या गीतावर आधारित २५ सहकलावंतांसह त्या गणेश वंदना सादर करतील. यानंतर भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना त्यांची भाची व गायिका राधा मंगेशकर ‘मोगरा फुलला’ आणि ‘जय देव जय देव जय शिवराय’ ही गाणी सादर करून आदरांजली वाहतील. भारतरत्न स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांना त्यांचे शिष्य पं. उपेंद्र भट ‘तीर्थ विठ्ठल’ आणि ‘माझे माहेर पंढरी’ या अभंगांद्वारे श्रद्धांजली अर्पण करतील. ‘स्वरस्वप्न’ ग्रुप तर्फे ते २२ वर्षे वयोगटातील ४० मुले व मुली भारतरत्न (कै.) लता मंगेशकर आणि पद्मविभूषण (कै.) पं. शिवकुमार शर्मा यांना सामूहिक व्हायोलिनद्वारा श्रद्धांजली अर्पण करतील. याचे संगीत संयोजन खप्ना दातार यांनी केले आहे. १९५७ये ‘आझाद’ चित्रपटातील ‘राधा ना बोले ना बोले ना बोले रे…’ हे लता दीदींचे प्रसिद्ध गाणे आणि शिवहरी’ या जोडीने अजरामर केलेली राग हंसध्वनीमधील ‘जा तोसे नहीं बोलू, कन्हैया’ हे दूत त्रिताल मधील शास्त्रीय बंदिश ‘झाला’ पद्धतीत व्हायोलिनवर सादर करणार आहेत.
यंदा महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेचे विलोभनीय दर्शन पडवणारा ‘खेळ मांडीयेला. हा दिडीचा विशेष कार्यक्रम ६० वारकरी सादर करतील. हे वारकरी प्रेक्षकांतून दिंडी घेऊन मंचावर रिंगण करतील त्यानंतर फुगड्या, पाऊल्या वाटचालीचा अभंग, ज्ञानोबा तुकारामांचा गजर करीत पखवाज, वीणा, टाळ तसेच पताका याद्वारे वारीचे दर्शन घडवतील. डॉ. भावार्थ रामचंद्र देखणे आणि ज्ञानेश्वर माउलीचे पुजारी अवधूत गांधी यांचे दिग्दर्शन व सादरीकरण केले आहे. यानंतर ‘कल्पर्स ऑफ इंडिया’ हा महाराष्ट्र, राजस्थान आणि पंजाब या राज्यातील संस्कृतीचे दर्शन घडवणारा कार्यक्रम सादर होईल. ‘पिंगा’ (मराठी), ‘घुमर’ (राजस्थानी) आणि ‘भांगडा (पंजाबी) याद्वारे सादर होणाऱ्या कार्यक्रमात मीरा जोशी, मधुरा देशपांडे आणि नुपूर देवणकर या तीन अभिनेत्री नृत्याविष्कार सादर करतील, याची संकल्पना, निर्मिति व दिग्दर्शन स्वप्नील रास्ते यांनी केले आहे.
यानंतर ‘आपला अतुल्य भारत’ या संगीत व नृत्यमय कार्यक्रमात ‘मिले सूर मेरा तुम्हारा या मधुर धूनवर महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, झारखंड, मणिपूर, मिझोराम व केरळ येथील कलावंत आपापल्या राज्यातील संस्कृती, परंपरा, वेशभूषा, दागिने, पारंपरिक वाद्ये आणि विविध नृत्य प्रकार एकत्रित सादर करून राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवतील. यामध्ये नृत्यांगना डॉ. देविका बोरठाकूर व भरतनाट्यम् नर्तक डॉ. परिमल फडके यांसह ६० हून अधिक विविध राज्यातील कलाकार सहभागी होत आहेत. याचे दिग्दर्शन डॉ. देविका बोरठाकूर आणि कुणाल फडके यांनी केले असून संकल्पना आणि संयोजन करुणा पाटील यांनी केले आहे. उद्घाटन सांस्कृतिक कार्यक्रमात शेवटी ‘लावणी एक रूप अनेक मध्ये नृत्यांगना भार्गवी चिरमुले, शर्वरी जमेनिस आर्या परदेशी व मानसी नाईक या महाराष्ट्रची लावणी, गुजरातचा गरबा आणि दक्षिणेकडील टॉलीवूड फ्युजन नेत्रदीपक नृत्यातून सादर करतील, नृत्यदिग्दर्शिका निकिता मोघे यांनी नृत्य दिग्दर्शन केले आहे.