राज्यातील सर्व एमआयडीसी परिसरात इव्ही स्टेशन्स उभारणारः सुभाष देसाई
मुंबई: इलेक्ट्रिक वाहनांसाठी आवश्यक असलेल्या चार्जिंग स्टेशनची संख्या वाढत आहे. आज मुंबई, भायखळा व दादर परिसरातील इलेक्ट्रिक वाहन वापरकर्त्यांसाठी मजेंडा व मध्य रेल्वेच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या देशातील पहिल्या चार्जिंग पोलचे उद्घाटन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते परळ येथे करण्यात आले.
इलेक्ट्रिक वाहन निर्मितीला चालना देण्यासाठी राज्य शासनाने विशेष धोरण तयार केले असून दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहनांना अनुदान देण्यात येते. एका बसमागे २० लाख रुपये अनुदान दिले जाते. याशिवाय इलेक्ट्रिक वाहने, उत्पादन, चार्जिंग स्टेशन आदींसाठी शासन अनुदान दिले जाते. विशेष बाब म्हणजे इलेक्ट्रिक वाहनांच्या नोंदणीसाठी शुल्क आकारले जाणार नाही. त्यामुळे राज्यात दिवसेंदिवस इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढत आहे. दरम्यान, येत्या काळात केंद्राने अधिक प्रोत्साहने वाढविण्यावर भर देण्याची आवश्यकता असल्याचे श्री. देसाई म्हणाले.
इंधनांवर चालणारी वाहने भंगारात विकली तर वाहनांऐवजी इलेक्ट्रिक वाहने घेण्यासाठी देखील सवलत दिली जाणार आहे. त्यामुळे येत्या काळात अधिकाधिक इलेक्ट्रिक वाहने वापरण्याची गरज आहे, असे श्री. देसाई म्हणाले.
दरम्यान, राज्यातील सर्व एमआय़डीसी परिसरात इव्ही चार्जिंग स्टेशन्स उभारली जाणार असून असून त्यासाठी जमीन व इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे श्री. देसाई यांनी स्पष्ट केले.