कर्तृत्ववान मान्यवरांचा एमसीएम टीव्ही व साईसागर एंटरटेन्मेंटच्या वतीने शानदार सोहळ्यात सन्मान
मुंबई: पनवेल येथील आद्य क्रांतिगुरू वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात रविवार, 16 ऑक्टोबर रोजी ‘स्टार महाराष्ट्राचे’ हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन एमसीएम टीव्ही आणि साईसागर एंटरटेन्मेंट नवी मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक जनार्दन शिंदे यांनी केले होते. यावेळी शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या राज्यभरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते, यशकल्याणी संस्थेचे गणेश भाऊ करे पाटील, ज्येष्ठ पत्रकार बालकिशन सोनी, महाराष्ट्र टुडेचे मुख्य संपादक विलास इंगळे, भास्करविश्व मीडियाचे मुख्य संपादक सुधीर जगदाळे, दै. दिव्य मराठीचे वरिष्ठ उपसंपादक संतोष भांडवले यांची उपस्थिती होती.
राज्यातील विविध क्षेत्रात सर्वस्व झोकून देऊन काम करणारे अनेक आहेत, अशा व्यक्तींची निवड करून त्यांच्या कार्याचा गौरव करणे खरे तर हे काम अवघड आहे. मात्र, जनार्दन शिंदे हे काम नेटाने करत आहेत. अशा कार्यक्रमामुळे गौरव झालेल्यांची जबाबदारी वाढते व त्यांना अशी समाजोपयोगी कामे करण्याचा हुरूप येतो, असे गौरवोद्गार पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते यांनी काढले. तर अशा पुरस्कार सोहळ्याने कामाचा उत्साह वाढतो आणि प्रेरणा मिळते त्यामुळे असे कार्यक्रम महत्त्वाचे ठरतात, असे याप्रसंगी मेघराज भोसले यांनी अध्यक्षीय समारोप करताना सांगितले. यावेळी यशकल्याणी संस्थेचे गणेश करे पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी मुकेश उपाध्ये, शाहीर सुरेश जाधव, शाहीर देवानंद माळी, भारूडकार शेखर भाकरे यांचा मनोरंजनपर कार्यक्रम सादर करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कॅमेरामन संस्कार व राजेश गोकलानी, फोटोग्राफर अजय कस्तुरे, साई व सागर शिंदे, सौ. प्रतिमा शिंदे, अमोल त्रिभुवन, विष्णू वाघमोडे, पूजा केदारे, दीक्षा खरात, साईनाथ जाधव यांनी पुढाकार घेतला. अच्युत भोसले यांनी आभार मानले.
यांचा झाला गौरव: उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना कोरोना काळात उत्कृष्ट काम केल्याबद्दल संजय कोलते, चित्रपट नाटक क्षेत्रातील मेघराज भोसले, गणेश करे पाटील, पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ पत्रकार बालकिशन सोनी, विलास इंगळे, सुधीर जगदाळे, संतोष भांडवले, सुरेश चित्ते यांच्यासह वैद्यकीय, प्रशासन, राजकारण, उद्योजकता आदी विविध क्षेत्रातील अजय मुंडे, अशोक येरेकर, जयंत भोसेकर, नामदेव गंभीरे, किरण आंबेकर, कास्मील बारदेशकर, चंद्रशेखर केकान, शिल्पा चौधरी, डॉ. डी. पी. नाईकवाडे, मनोज बागडे, लक्ष्मण खुरकुटे, लक्ष्मीकांत माळवतकर, सुरेश त्रिमुखे आदी मान्यवरांचा स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.