अंबाजोगाई: येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या मेडिसीन विभागातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या संख्या वाढवण्यासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान संस्थेच्या वतीने नुकतीच मान्यता मिळाली असून आता मेडिसीन विभागात प्रतिवर्षी सहा विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश मिळणार असून वैद्यकीय उपचार सुविधेवरील ताण कमी होण्यास ही मदत होणार आहे.
स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या मेडिसीन विभागातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ करण्यासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान संस्थेच्या वतीने करण्यात येणारी तपासणी जून २०२१ मध्ये करण्यात आली होती. या तपासणीचा अंतीम अहवाल वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांना नुकताच मिळाला असून मेडिसीन विभागातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांची संख्या तीन वरुन सहा वर वाढवण्यात आली आहे. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मेडिकल असायसमेंट ऍण्ड रॅटनींग बोर्ड (एमएसआयबी)चे अध्यक्ष यांच्या स्वाक्षरीने देण्यात आलेल्या अहवालानुसार स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या मेडिसीन विभागात सहा पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी शिक्षण देणाऱ्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध असल्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या तीन वरुन वाढून सहा करण्यात येत असल्याचे या अहवालात म्हटले आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासूनच ही संख्या वाढण्याची परवानगी ही राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने दिली आहे.
स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या मेडिसीन विभागाचे राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाचे पहिली तपासणी तत्कालीन अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या कार्यकाळात झाली होती. यानंतर त्यांनी तीन एवजी सहा सीट वाढवण्याबाबतची तपासणी आयोगाने करावी असा प्रस्ताव राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडे पाठवला होता. सदरील प्रस्तावानुसार जून २०२१ मध्ये राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने ही तपासणी केली होती. सदरील तपासणी पूर्ण करुन घेण्यासाठी अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे आणि मेडिसीन विभाग प्रमुख डॉ. सिध्देश्वर बिराजदार यांनी पूर्ण करुन घेतली होती. या कामी वैद्यकीय महाविद्यालयाचे उप अधिष्ठाता डॉ. राजेश कचरे, डॉ. शंकर धपाटे, नाक कान घसा विभाग प्रमुख डॉ. प्रशांत देशपांडे, शल्य चिकित्सा विभाग प्रमुख डॉ. नितीन चाटे, रक्त विभागाचे डॉ. बिरारे, डॉ. शिला गायकवाड, फिजिऑलॉजी विभाग प्रमुख डॉ. सुनिता बिराजदार, डॉ. विनोद वेदपाठक आणि रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. राकेश जाधव, उप अधीक्षक डॉ. विश्वजित पवार, डॉ. अमित लोमटे, यांच्यासह एमसीआयची स्थानिक टीम ने सहकार्य केले. सदरील तपासणीची कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी डॉ. विशाल लेडे व विभागातील सर्व अध्यापक वृंदांनी सहकार्य केले.
स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या मेडिसीन विभागातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचा अहवाल प्राप्त झाल्याबद्दल अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे आणि मेडिसीन विभाग प्रमुख डॉ. सिध्देश्वर बिराजदार यांचे विधान परिषदेचे सदस्य आ. संजय दौंड, विधानसभेच्या सदस्या आ. नमिता मुंदडा, माजी मंत्री ऍड. पंडितराव दौंड, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा, नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, माजी आमदार पृथ्वीराज साठे, मानवलोक चे कार्यवाह अनिकेत लोहिया आणि इतर मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.