मुंबई: मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळ्यात अटक केलेल्या आरोपींकडून धक्कादायक माहिती समोर आली आहे. रिपब्लिक टीव्ही, महा मुव्हीज आणि न्यूज नेशन या तीन वाहिन्यांच्या चालक आणि मालकांकडून पैसे मिळाल्याचे त्यांनी सांगितले. आरोपींनी थेट चालक आणि मालकांची नावे घेतल्याने पोलिसांनी त्यांना ‘पाहिजे आरोपी’ केले आहे. यामुळे या वाहिन्यांच्या अडचणींत आणखी भर पडली आहे.
पैसे देऊन टीआरपी वाढवण्याचा घोटाळा उघडकीस आणल्यानंतर मुंबई पोलिसांनी आतापर्यंत नऊ आरोपींना अटक केली आहे. यामध्ये फक्त मराठी’, ‘बॉक्स सिनेमा’ या दोन चॅनेल्सचे मालक शिरीष सतीश पट्टानशेट्टी आणि नारायण नंदकिशोर शर्मा यांच्यासह हंसा कंपनीच्या माजी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यापैकी रामजी वर्मा आणि दिनेश विश्वकर्मा या आरोपींची कोठडी संपत असल्याने त्यांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. या दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अटक आरोपींच्या चौकशीमध्ये अभिजित उर्फ अजित व त्याच्या अन्य साथीदारांनी रिपब्लिक टीव्ही, महामूव्हीज आणि न्यूज नेशन या वाहिन्या पाहण्यासाठी पैसे दिल्याचे म्हटले आहे. तसेच आरोपींना कोठडी वाढवून मिळावी यासाठी पोलिसांनी न्यायालयात केलेल्या अर्जात याबाबत नमूद केले असून, या तिन्ही वाहिन्यांच्या चालक, मालक आणि इतर सहकाऱ्यांना ‘पाहिजे आरोपी’ करण्यात आले आहे. त्यामुळे फक्त मराठी तसेच बॉक्स सिनेमा प्रमाणे या वाहिन्यांच्या मालकांवरही या प्रकरणात कारवाई होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.