मुंबई: गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये आजपासून ‘इंडियन ऑटो शो’ ला प्रारंभ झाला असून त्याचे उद्घाटन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. तीन दिवस चालणाऱ्या या शोमध्ये प्रमुख ऑटोमोबाईल कंपन्या सहभागी झाल्या आहेत.
श्री.देसाई म्हणाले की, ऑटोमाबाईल क्षेत्रामध्ये दिवसेंदिवस बदल होत आहेत. नव्या तंत्रज्ञानावर आधारित वाहन बाजारात दाखल होत आहे. चारचाकी वाहनं वापरणे आज प्रत्येकाची गरज झाली आहे. ग्राहकांना आपल्या आवडीनिवडीनुसार वाहन निवडण्याची संधी या प्रदर्शनामुळे उपलब्ध झाली आहे. या प्रदर्शनामुळे व्यापाराला मोठी चालना मिळेल.
येत्या काही दिवसांत इलेक्ट्रिक वाहनांना मोठी मागणी वाढणार आहे. राज्य शासनाने इलेक्ट्रॉनिक्स वाहनांसाठी स्वतंत्र असे धोरण आणले आहे. याद्वारे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे. भविष्यात पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने या क्षेत्राला मोठा वाव असेल. यावेळी एमआयडीसीचे मार्केटींग हेड अभिजीत घोरपडे, प्रसन्न पटवर्धन, दीपक नायर आदी उपस्थित होते.