# बीड जिल्ह्यात येण्यासाठी व्यक्ती, वाहनांना ई-पास देऊ नये; प्रवेशासाठी 16 चेक पोस्ट.

बीड:  बीड जिल्ह्यात १ आॅगस्ट २०२० पासून लॉकडाऊनची मुदत वादविण्यात आली असून त्यामुळे जिल्ह्यात येण्यासाठी व्यक्ती व वाहनांना देण्यात येणारे ई परवाने स्थगित ठेवण्यात यावेत, असे पत्र जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी राज्यातील इतर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व पोलीस आयुक्त यांना पाठवले आहे. दरम्यान, जिल्ह्यात प्रवेशासाठी 16 चेक पोस्ट निश्चित करण्यात आले आहेत.

कोविड-१९ प्रतिबंधात्मक उपाययोजने अंतर्गत महाराष्ट्र राज्यात अनलॉकची अंमलबजावणी केली जात आहे. राज्याच्या विविध भागात लॉकडाऊनमध्ये अडकलेले प्रवासी, विद्यार्थी, कामगार इत्यादींना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व पोलीस आयुक्त यांचेकडून ई परवाने दिले जातात. त्यामुळे इतर जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागामधून बीड जिल्ह्यामध्ये येण्यासाठी दैनंदिन किंवा इतर स्वरुपातील प्रवासाचे कोणतेही ई परवाने, इतर परवानग्या ३१ आॅगस्ट २०२० पर्यंतच्या कालावधीसाठी देण्यात येवू नयेत. केवळ वैद्यकीय तातडीची खात्री झाल्यास व सदर व्यक्ती आपल्या क्षेत्रातील रहिवाशी असल्यास आधारकार्ड पत्यानुसार परवानगी द्यावी असे नमूद केले आहे. यातून केवळ मालवाहतूक, अत्यावश्यक सेवा संबंधीच्या व्यक्तींना व वाहनांना सुट द्यावी अशी विनंती या पत्राद्वारे केली आहे.

विलगीकरण प्रक्रियेसाठीचे निर्देश:

बाहेरच्या जिल्ह्यामधून बीड जिल्ह्यात येणार्‍या व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरणच्या शहरी व ग्रामीण भागातील प्रक्रियेसाठीचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जारी केले आहेत. तसेच दररोज जिल्ह्याबाहेर जाऊन येणे आवश्यक आहे अशा व्यक्तींसाठी दैनंदिन प्रवासासाठी ई-पास काढून आणि अँटिजेन टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे.

या विलगीकरण प्रक्रियेसाठीच्या निर्देशानुसार ग्रामीण भागात बाहेरच्या जिल्ह्यामधून येणारी प्रत्येक व्यक्ती गावाच्या जिल्हा परिषद शाळेत Institutional Quarantine करण्यात येईल. या व्यक्तीसाठी शाळेत पाणी, स्वच्छता इ. या सर्व सुविधा पुरविण्याची जबाबदारी ग्रामपंचायतची असेल, जेवणाची व्यवस्था शक्यतोवर त्या व्यक्तीच्या कुटुंबाद्वारेच करण्यात येईल. गावामध्ये बाहेर जिल्ह्यातून येणारा प्रत्येक व्यक्ती कोणाच्याही संपर्कात न येता थेट या Institutional Quarantine केंद्रामध्ये जाईल याची खात्री गावचे सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील व ग्रामदक्षता समिती यांनी करावयाची आहे.

शहरी भागातील बाहेरच्या जिल्ह्यातून येणाऱ्या सर्व व्यक्तींची Institutional Quarantine व्यवस्था राहील, सदरील व्यक्तींची माहिती घेवून त्यांना शहरात येताच इतर कोणत्याही व्यक्तीच्या संपर्कात न येता थेट Institutional Quarantine सेंटरवर आणण्याची जबाबदारी संबंधित मुख्याधिकारी नगर परिषद, नगर पंचायत यांची असणार आहे यासाठी त्यांना वार्ड दक्षता समिती मदत करणार आहे. जिल्ह्यामध्ये प्रवेश करण्यासाठी सर्व नागरिकांनी खालील केवळ 16 चेक पोस्ट चा वापर करावा. जिल्ह्याच्या हद्यीवरील इतर सर्व रस्ते वापरले जाणार नाहीत यासाठी ग्रामपंचायत, तहसीलदार व पोलीस निरिक्षक यांच्याकडून कार्यवाही करण्यात येईल.

ई-पास शिवाय कोणतीही व्यक्ती चेकपोस्टवर जिल्ह्याबाहेर जाणार नाहीत किंवा जिल्ह्यात येणार नाहीत याची खात्री पोलीस विभागाने करावी आणि तसेच जिल्ह्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा ई-पास वरील टोकन नंबर तालुकानिहाय नमूद करुन घ्यावा आणि प्रत्येक तासांनी त्या टोकन नंबरची तालुकानिहाय यादी आरोग्य विभाग, जिल्हा परिषद यांच्या केंद्रीय नियंत्रण कक्षाकडे पाठवावी असे नमूद केले आहे.

सर्व चेक पोस्टवरील आलेल्या अशा याद्या वापरुन दर तासाला संबंधित मुख्याधिकारी, ग्रामसेवक यांना येणाऱ्या व्यक्तींची स्थानिक पत्यासह आणि फोन नंबरसह ई-पास वरील सर्व माहिती आरोग्य विभागामार्फत पाठविण्यात येणार आहे. या माहितीच्या आधारे संबंधित मुख्याधिकारी, ग्रामसेवक त्या व्यक्तींना त्वरित Institutional Quarantine करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.

जिल्ह्यामध्ये सध्या राहणाऱ्या व्यक्ती ज्या काही कारणास्तव जिल्ह्याबाहेर जाऊन येतील त्यांना नेहमीप्रमाणेच 28 दिवस होम क्वारंटाईन बंधनकारक असेल. परंतु जिल्ह्यामध्ये प्रवेश केल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्यांची अँटिजेन टेस्ट घेण्यात येईल आणि त्यासाठी त्यांना तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाद्वारे ज्या आरोग्य केंद्रावर बोलावण्यात येईल तेथे नियोजित वेळेत येणे बंधनकारक असेल.

दररोज जिल्ह्याबाहेर जाऊन येणे आवश्यक आहे असे दूध विक्रेते, फळभाजी विक्रेते, खाजगी, शासकीय आस्थापनावरील अधिकारी, कर्मचारी आदी अशा व्यक्तींंनी सुध्दा ई-पास काढूनच प्रवास करणे बंधनकारक असेल परंतु ई-पासचा फॉर्म भरतांना दैनंदिन प्रवासासाठी’ असा उल्लेख असणे बंधनकारक असेल अन्यथा पास रद्य करण्यात येईल. तसेच असा पास धारण करणाऱ्या व्यक्तींना आठवड्यातून एकदा अँटिजेन टेस्टसाठी नियोजित आरोग्य केंद्रावर बोलाविण्यात येईल आणि नियोजित वेळेत तेथे जाणे बंधनकारक असेल अन्यथा आपला पास रद्द करण्यात येईल. अशा सर्व व्यक्तींना याप्रमाणे आरोग्य केंद्रावर आणण्यासाठी सर्व मुख्याधिकारी, ग्रामसेवक यांचेसह सर्व शासकीय संबंधित विभाग सहकार्य करतील.

जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी हे आहेत 16 चेक पोस्ट:

1.खामगांव पुल (ता. गेवराई)
2. महार टाकळी (ता.गेवराई) 3.मातोरी (ता.गेवराई)
4.मानेर (ता.शिरुर)
5.दोलावडगांव (ता.आष्टी) 6.वाघळूजतांडा (ता.आष्टी) 7.गंगामसला (ता.माजलगांव) 8.सादोळा (ता.माजलगांव)
9. सौताडा (ता.पाटोदा)
10.सोनपेठ फाटा (ता.परळी)
11.साकतरोड (ता.पाटोदा) 12.चौसाळा (ता.बीड)
13.माळेगांव (ता.केज)
14.यापूर (ता.अंबाजोगाई) 15.बोरगांव (ता.केज)
16.देवळा (ता.अंबाजोगाई).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *