# परळी जवळील सिरसाळा एमआयडीसीला उद्योग विभागाची मान्यता.

मुंबई: परळी तालुक्यातील सिरसाळा येथील जमिनीवर एमआयडीसी उभारण्याच्या प्रस्तावास उद्योग विभागाने मान्यता दिली आहे. उद्योग मंत्री ना. सुभाष देसाई यांचे खाजगी सचिव उमेश वाघ यांनी मुंडेंच्या कार्यालयास पत्राद्वारे ही माहिती दिली आहे. दरम्यान, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी परळी मतदारसंघातील सिरसाळा येथे एमआयडीसी उभारणीच्या प्रस्तावास मान्यता दिल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेऊन त्यांचे आभार व्यक्त केले.

परळी तालुक्यातील सिरसाळा येथील अधिसूचित करण्यात आलेल्या जमिनीवर औद्योगीक क्षेत्र – 2 अंतर्गत एमआयडीसी उभारण्याची मागणी धनंजय मुंडे यांनी उद्योग विभागाला केली होती. विधानसभा निवडणुकीच्या नंतर झालेल्या अधिवेशनादरम्यान यासंदर्भात ना. देसाई यांच्याशी चर्चा करून एमआयडीसी प्रस्तावित करण्यात आली होती. त्यानुसार यासाठी अधिसूचित करण्यात आलेल्या जमिनीची उद्योग विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी करून राज्य शासनाला याबाबतचा अहवाल सादर करण्यात आला होता व त्यानुसार जमीन संपादित करण्याची प्रक्रिया उद्योग विभागामार्फत सुरू होती. धनंजय मुंडे स्वतः याबाबत सातत्याने पाठपुरावा करत होते.

लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे, स्व. पंडित अण्णा मुंडे यांनी या भागाचा सर्वांगीण विकास व्हावा, असे स्वप्न पाहिले होते. या भागातील सर्वसामान्य माणसाचे दरडोई उत्पन्न वाढावे, इथल्या युवकांना इथेच रोजगार मिळावा यासाठी आपण कटिबद्ध आहोत. एमआयडीसी उभारणीच्या प्रस्तावास मान्यता मिळाल्याने परळीच्या विकासाबाबत पाहिलेले एक मोठे स्वप्न पूर्ण होताना आनंद होत असल्याची प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *