संग्रहित छायाचित्र
मुंबई: कोरोनामुळे आव्हानात्मक परिस्थिती असताना उद्योग विभागाने राज्यातील उद्योगचक्राला गती दिली आहे. सध्या राज्यात ६६ हजार ९५३ उद्योग सुरू करण्यासाठी परवाने दिले आहेत. ३८२८७ उद्योगांचे उत्पादन सुरू झाले आहे. त्यात १० लाख ६६ कामगार रुजू झाले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील २१३१ उद्योग सुरू झाले आहे. तीस हजार कामगार रुजू झाले आहेत, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.
कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात मोठे उद्योग सुरू करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या वेबिनारमध्ये श्री. देसाई बोलत होते. यावेळी खासदार धैर्यशील माने, स्थानिक आमदार व उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री. देसाई म्हणाले की, कोल्हापूर-मुंबई-बंगळुरू परिसरात लॉजिस्टिक पार्क सुरू करण्यासाठी एमआयडीसी पुढाकार घेईल. शेतकरी जमीन देण्यास तयार असतील तर लॉजिस्टि पार्क तयार केले जाईल. उद्योगांना माफक दरात वीज देण्यासाठी एमआय़डीसी वीज वितरणाचा परवाना घेणार आहे. चांदी उद्योगांसाठी धोरण ठरवले जाईल. मागासवर्गीय उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी समाजकल्याण मंत्र्यांसोबत बैठक घेतली जाईल. याशिवाय कापड उद्योगासाठी सवलती देण्यासाठी लवकरच बैठक घेतली जाईल. कोल्हापूर औद्योगिक वसाहतीत परिसरात पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा. राज्य शासन त्यांना मदत करण्यास तयार आहे.
कोरोनामुळे परदेशी गुंतवणुकदारांना महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याची संधी आहे. महाराष्ट्रचा उद्योग विभाग अनेक देशांसोबत वाटाघाटी करत आहे. या वाटाघाटी प्रगत अवस्थेत आहेत. विविध देशांचे सल्लागार आमच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात मोठा उद्योग आणण्यासाठी प्रयत्न केले जातील.
औद्योगिक कामगारांसाठी आम्ही कामगार ब्यूरो सुरू करत आहेत. उद्योगांनी स्थानिकांना या ठिकाणी रोजगारांची संधी द्यावी. कामगार, कौशल्ये, उद्योग विभागाद्वारे हे ब्यूरो चालवले जाणार आहे. यातून स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराची संधी मिळणार आहे.