# मराठवाड्यात ५८२२ उद्योगांना परवाने; विदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी टास्क फोर्स.

 

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई: राज्यातील उद्योगचक्र पूर्वपदावर येत असून सद्यस्थितीत ६५ हजार उद्योगांना उद्योग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यापैकी ३५ हजार उद्योगांनी उत्पादन घेण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे सुमारे नऊ लाख कामगार रुजू झाले आहेत, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात विविध कामांचा आढावा घेतल्यानंतर श्री. देसाई यांनी ही माहिती दिली. मराठवाड्यात ५८२२ उद्योगांना परवाने दिले असून ४५०० उद्योग सुरू झाले आहे. त्यात ८२ हजार कामगार रुजू झाले आहेत. उद्योगचक्राने गती घ्यावी, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. असे असले तरी आपली मुख्य लढाई कोरोनाशी आहे. सामाजिक अंतर पाळणे, कामगारांना सॅनिटायझर पुरवणे, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आदी बाबी काटेकोरपणे पाळण्याच्या सूचना श्री. देसाई यांनी यावेळी उद्योजकांना दिल्या.

दरम्यान, विदेश गुंतवणुकदारांना महाराष्ट्राकडे आकर्षित करण्यासाठी उद्योग विभागाने वरिष्ठ अधिकाऱ्यांचा टास्क फोर्स तयार केला आहे. अमेरिका, जपान, तैवान, जर्मनी, जपान, इंग्लड आदी देशांच्या प्रतिनिधींसोबत अधिकारी वाटाघाटी करत आहेत. एमआयडीसीने विदेश गुंतवणूकदारांसाठी राज्याच्या विविध भागात सुमारे चाळीस हजार हेक्टर जमीन राखीव ठेवली आहे. याशिवाय उद्योग सुरू करण्यासाठी लागणाऱ्या विविध परवान्यांचा जाच कमी करून महापरवाना दिला जाणार आहे. यामुळे उद्योग झटपट सुरू होतील. एकदा उद्योग सुरू झाल्यानंतर पुढील दोन वर्षांत उर्वरित परवाने घ्यावे लागणार आहेत, असेही श्री. देसाई यांनी स्पष्ट केले.

गुंतवणूक वाढवण्यासाठी उद्योग विभागाने खुले धोरण स्वीकारले आहे. त्याचाच भाग म्हणून विविध परवान्यांची अट शिथिल केली आहे.  आगामी काळात देश विदेशातील फार्मा कंपन्या राज्यात गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. त्यामुळे औद्योगिक धोरणात फार्मा क्षेत्रासाठी विशेष धोरण तयार केले जाणार आहे.

उद्योगांमध्ये कामगारांची टंचाई निर्माण होई नये, म्हणून उद्योग, कामगार व कौशल्ये विकास विभागाच्यावतीने कामगार ब्यूरोची स्थापना केली जाणार आहे. अवघ्या सात दिवसांत कामगारांना प्रशिक्षण देऊन उद्योगांची गरज पुरविली जाणार आहे. यामुळे उद्योगांना कुशल, अकूशल मजूर, कामगार मोठ्या संख्येने उपलब्ध होतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *