नांदेड: विजय होकर्णे
पोळा अन् झाले सगळे सण गोळा या आपल्या भागातील म्हणीप्रमाणे शनिवार, २२ ऑगस्टपासून गणेशोत्सवाला अत्यंत भावपूर्ण वातावरणात सुरुवात झाली आणि वातावरण प्रसन्न झाले कोरोनातून बरे होण्याची संख्याही तिपटीने वाढू लागली.. तसे कोरोनामुळे यंदा गणेशोत्सवासह सर्वच सण अत्यंत साधेपणाने साजरा होणार असले तरी, प्रत्येकाच्या घरी परंपरा आणि कुळाघाराप्रमाणे या सणाचा तोच उत्साह पाहायला मिळत आहे.
गणपती बाप्पांचे आगमन झाल्यावर तीन दिवसांनी गौरींचे म्हणजेच महालक्ष्मीचे घरोघरी आगमन झाले. गौरीचे आवाहन मंगळवारी दुपारी अनुराधा नक्षत्रावर झाले. तर बुधवार, २६ ऑगस्ट रोजी गौरीपूजन सोहळा होत आहे. महाराष्ट्रातील हा खास सण आहे. यास काही ठिकाणी महालक्ष्मी पूजन असेही म्हणतात. भाद्रपद महिन्यात शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर आपापल्या कुलाचाराप्रमाणे महालक्ष्मी/गौरी बसवितात. त्यानंतर ज्येष्ठा नक्षत्रावर गौरीची पूजा करतात आणि महानैवेद्य दाखवितात. तिसऱ्या दिवशी म्हणजेच मूळ नक्षत्रावर गौरींचे विसर्जन करतात.
महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यानुसार किंवा गौरींच्या पूजेची पद्धत आणि परंपरा या वेगवेगळ्या असल्याचे पहावयास मिळते. काही कुटुंबात गौरींचे मुखवटे असतात, तर काही कुटुंबात परंपरेनुसार पाणवठ्यावर जाऊन पाच, सात किंवा अकरा खडे आणून त्यांची पूजा केली जाते. काही ठिकाणी पाच मडक्यांच्या उतरंडी करून त्यावर गौरीचे मुखवटे लावून त्या उतरंडींनाच साडी चोळी नेसवतात आणि त्यांची पूजा करतात. गौरींच्या आगमनानंतरचा दुसऱ्या दिवस हा अतिशय महत्वाचा असतो. या दिवशी गौरींची पूजा करून त्यांना गोडधोडाचा नैवद्य दाखवतात. याच दिवशी संध्याकाळी महाराष्ट्रात काही जागी महिलांचा हळद- कुंकवाचा कार्यक्रम केला जातो. तसे मराठवाड्यातील काही जिल्ह्यात विसर्जनाच्या दिवशी सजावट करून घरोघरी जाऊन महालक्ष्मीचे दर्शन घेण्याचीही परंपरा आहे. महिला एकमेकींच्या घरी हळदी कुंकवाला जातात. महालक्ष्मी समोर केलेली चढाओढीने सजावट, रांगोळ्या, देखावे करण्यात येतात… अशा प्रकारे महालक्ष्मी ऊत्सव सर्व कुटुंबीय एकत्र येऊन साजरा करण्याची परंपरा संस्कृती आजही कायम आहे हे विशेष…