महिला लिपिकाशी असभ्य भाषेत बोलणे भोवले; मुंबई उच्च न्यायालयाचे प्रधान सचिवांना पत्र
पुणे: उच्च शिक्षण संचालनालयातील महिला लिपिकाशी असभ्य भाषेत बोलणे शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांना भोवले असून राज्यपाल नियुक्त माजी आमदार बर्ट्रांड मुल्लर (अकोला) यांच्या तक्रारीच्या पत्रावर मुंबई उच्च न्यायालयाने याप्रकरणी माने यांची चौकशी करण्याचे निर्देश शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना दिले आहेत.
पुण्यातील उच्च शिक्षण संचालनालय येथे शिक्षण संचालक पदावर कार्यरत डॉ. माने यांच्या कार्यालयातील लिपिक महिला फाईल वर संचालकांच्या सह्या घ्यायला गेल्या असताना सर्वांसमोर त्यांनी ‘आतापर्यंत तू झोपली होतीस का? नालायक, मूर्ख’ असे असभ्य आणि उर्मट एकेरी भाषा मोठ्या आवाजात वापरून भयभीत केले. येथील कर्मचारी वर्गाने या वर्तणुकीविरोधात लेखणी बंद आंदोलन केले. हृदयविकारावरील शस्त्रक्रिया झालेल्या संबंधित लिपिक महिलेने मुख्यमंत्र्यांपासून अनेक ठिकाणी या प्रकरणी तक्रारी केल्या होत्या. दरम्यान, हा प्रकार समजल्यावर माजी आमदार बर्ट्रांड मुल्लर यांनी जुलै २०२१ मध्ये उच्च न्यायालयाकडे तक्रारीचे पत्र (इमेल) पाठवून माने यांच्या विरोधात दाद मागितली. त्यावर उच्च नायायालयाने ११ ऑकटोबर २०२१ रोजी याप्रकरणी माने यांची चौकशी करण्याचे निर्देश शिक्षण विभागाच्या जन तक्रार कक्षाच्या प्रधान सचिवांना दिले आहेत.
तक्रार मागे घेतली जाऊ नये म्हणून उच्च नायायालयात दाद:
‘डॉ. धनराज माने यांनी कर्मचारी वर्गाशी केलेल्या उर्मट, असभ्य वर्तणुकीच्या यापूर्वीही अनेक तक्रारी आल्या आहेत. तक्रारदारांना ते भीती दाखवून तक्रार मागे घ्यायला लावत असत. मात्र, हे प्रकरण कळताच तक्रार मागे घेतली जाऊ नये म्हणून मी उच्च नायायालयात दाद मांगितली. न्यायालयाने चौकशीचे निर्देश दिले असून लवकरच अहवाल समोर येईल. इतर अनेक प्रकरणात माने यांच्यावर निलंबनाची कारवाई झालेली आहे, ‘असे राज्यपाल नियुक्त माजी आमदार बर्ट्रांड मुल्लर यांनी सांगितले.