नवी दिल्ली: केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज सांगितले की, कोरोना साथीच्या आजारामुळे उद्भावेल्या गंभीर आव्हानांमुळे, सौदी अरेबियन सरकारच्या निर्णयाचा आदर करत आणि लोकांचे आरोग्य आणि हित लक्षात घेत भारतातील मुसलमानांना यावर्षी हज (1441 एच/2020 एडी) साठी सौदी अरेबियाला न पाठवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ते आज नवी दिल्ली येथे प्रसार माध्यमांशी बोलत होते.
ते म्हणाले की, सौदी अरेबियाचे हज आणि उमराह मंत्री डॉ. मोहंमद सालेह बिन ताहेर बेन्तेन यांचा दूरध्वनी आला होता, त्यांनी कोरोना साथीच्या आजारामुळे यावर्षी (1441 एच/2020 एडी) भारतातून हज यात्रेकरूंना हजसाठी न पाठविण्याची सूचना केली आहे. ते म्हणाले की, याविषयावर त्यांनी सविस्तर चर्चा केली आणि आपली सहमती दर्शविली, संपूर्ण जग कोरोना साथीच्या आजारामुळे उद्भवलेल्या आव्हानांचा सामना करत आहे आणि सौदी अरेबियावर देखील या साथीच्या आजाराचा परिणाम झाला आहे.
नक्वी म्हणाले की, हज 2020 साठी 2 लाख 13,000 अर्ज प्राप्त झाले होते. कोणतेही शुल्क न कापता अर्जदारांनी जमा केलेली रक्कम तातडीने परत करण्याची प्रक्रिया सुरु केली असून ऑनलाईन डीबीटी पद्धतीने अर्जदारांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जातील.
मंत्री नक्वी म्हणाले की, 2300 हून अधिक महिलांनी मेहरम शिवाय हज यात्रेला जाण्यासाठी अर्ज केला होता. या महिलांना आता हज 2021 यात्रेसाठी हज 2020 च्या अर्जाच्या आधारेच हज यात्रेसाठी पाठविले जाईल. त्याशिवाय, पुढच्या वर्षी मेहरमशिवाय हज यात्रेसाठी नवीन अर्ज करणार्या सर्व महिलांनाही हज यात्रेसाठी पाठवले जाईल.
नक्वी म्हणाले की, 2019 मध्ये एकूण 2 लाख भारतीय मुसलमानांनी हज यात्रा केली होती. या यात्रेकरुंमध्ये 50 टक्के महिला होत्या. 2018 मध्ये मुस्लिम महिला मेहरम शिवाय (पुरुष जोडीदाराशिवाय) हज यात्रा करू शकतात हे सरकारने सुनिश्चित केल्यापासून आतापर्यंत एकूण 3040 महिलांनी हज यात्रा केली आहे.
काल रात्री उशिरा सौदी अरेबियाच्या हज आणि उमराह मंत्रालयाने एक निवेदन जारी केले आहे ज्यात म्हटले आहे की “कोरोना साथीच्या आजारामुळे आणि गर्दीच्या ठिकाणी आणि मोठ्या संख्येने लोकं जमा होणाऱ्या ठिकाणी कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या धोक्यामुळे या वर्षासाठी हज सौदी अरेबियामध्ये आधीपासूनच राहत असलेल्या विविध देशांमधील लोकांद्वारेच अत्यंत मर्यादित संख्येने हज यात्रा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व प्रतिबंधक उपाय आणि शारीरिक अंतराच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीकोनातून हज सुरक्षित पद्धतीने पार पाडला जावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ”