पुणे येथील इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयातील प्रकार
पुणे: इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे या कार्यालयातील सहसंचालक या 31 मे रोजी सेवानिवृत्त झाल्या. त्यांचा पदभार त्यांचे समकक्ष अधिकाऱ्यांकडे देणे अपेक्षित असते. असे समकक्ष अधिकारी उपलब्ध असतानाही सहसंचालक या निम्न पदाचा पदभार आयएस अधिकाऱ्यांकडे देऊन आयएएस अधिकारी पदाचा अवमान इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयात करून वेगळाच पायंडा पाडण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
पुणे येथे इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय हे कार्यालय आहे. हे कार्यालय राज्यस्तरीय असल्यामुळे येथे राज्य सेवेतील आयएएस नसलेले व वरिष्ठ पदावरील अधिकारी हे आयएएस आहेत. या कार्यालयातील सहसंचालक या 31 मे रोजी नियत वयोमानानुसार निवृत्त झाल्या. त्यामुळे त्यांचा पदभार त्यांच्या समकक्ष यांना देणे अपेक्षित असते. जर समकक्ष नसेल तर त्यांच्या पेक्षा निम्न दर्जाच्या अधिकाऱ्यांना त्याचा पदभार द्यावा लागतो. इथे मात्र, वेगळाच पायंडा पाडून सहसंचालक या निम्न दर्जाच्या पदाचा पदभार आयएएस अधिकारी दिलीप हळदे यांच्याकडे देण्यात आला आहे. एका आयएएस अधिकार्याकडे खालच्या पदाचा कार्यभार देणे म्हणजे तो आयएएस अधिकाऱ्यांच्या पदाचा अवमान आहे. या खात्याचे प्रधान सचिव जे.पी. गुप्ता यांनी हा आदेश का व कशासाठी काढलेला आहे? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. खरतर या पदाचा कार्यभार हा लगतच्या अधिकाऱ्यांकडे द्यावा किंवा समकक्ष अधिकार्याकडे द्यावा समकक्ष अधिकारी उपलब्ध नसेल तर तो त्यापेक्षा निम्न असणारे अधिकाऱ्यांकडे द्यावा असा सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय यांचा आदेश आहे. तसा शासन निर्णय आहे. शासन निर्णयाचा कुठलेही पालन न करता पदाचा गैरवापर करून अशा पद्धतीचा कार्यभार हस्तांतराचा आदेश प्रशासनामध्ये गोंधळ निर्माण करणारा आहे असे दिसते. याप्रकरणी या खात्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी लक्ष घालून असे चुकीचे पायंडा पाडणाऱ्या अधिकाऱ्यांना आवर घालून, याप्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.