औरंगाबाद: ज्येष्ठ माध्यम व शिक्षणतज्ज्ञ तसेच एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुधीर गव्हाणे यांना आफ्रिका खंडाचा आतंरराष्ट्रीय पातळीवरचा शिक्षणक्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल “इंटरनॅशनल अकॅडमी अॅवार्ड २०२० “घोषित करण्यात आला आहे. उच्चशिक्षण व सामाजिक क्षेत्रातील हा अांतरराष्ट्रीय पुरस्कार याच महिन्यात २७ जून रोजी विशेष पदवीप्रदान समारोहात दिला जाणार आहे.
गरीब व वंचित घटकातील विद्यार्थी वर्गास सामाजिक न्यायाव्दारे सक्षम करण्यासाठी व मानवतेच्या कार्यासाठी हा सन्मान युनीकॅरेबीयन बिझीनेस स्कूल, युनिव्हर्सिटी ऑफ द कॉमनवेल्थ कॅरेबीयन यांनी हा पुरस्कार दिला आहे. प्रा. डॉ. सुधीर गव्हाणे यांनी आपल्या ३८ वर्षांच्या प्रदीर्घ अध्यापन कारकिर्दीत सामाजिक समता व मानवतेसाठी विद्यापीठस्तरावर काम केले आहे. वंचित व गरीब समाजातील शेकडो पत्रकार, संपादक, जनसंपर्क अधिकारी, टीव्ही -रेडिओतील पत्रकार व माध्यमकर्मी त्यांचे विद्यार्थी राहिलेले आहेत. अध्यापनापलीकडे जाऊन विद्यार्थी वर्गास आयुष्यात उभे करण्यात त्यांनी आधार दिला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक म्हणून दोन टर्म प्रभावी काम केले व गरीब विद्यार्थी वर्गासाठी असणारी कमवा व शिका योजनेचा व्यापक विस्तार केला. उत्तम प्राध्यापक, वक्ते, लेखक म्हणूनही त्यांचे लक्षणीय योगदान आहे. अधिष्ठाता, संचालक, विभागप्रमुख तसेच कुलगुरू या पदांचा आणि राष्ट्रीय पातळीवरील युजीसी व नॅक आदी संस्थांचाही अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. फुले, शाहू व आंबेडकर यांच्या विचारांचे ते पाईक आहेत. नामांतर लढ्यावरील महत्वपूर्ण ग्रंथ, अलीकडेच डॉ. आंबेडकरांवरील १२ ग्रंथमालिकेचे संकल्पन व संपादन त्यांनी केले आहे.