# कायदा, सुव्यवस्था पायदळी तुडविणे अशोभनीयः सुभाष देसाई.

मुंबई: राज्यात ‘ब्रेक द चेन; अंतर्गंत लावण्यात आलेले निर्बंध १ जूनपासून शिथिल करण्यात आले. औरंगाबाद शहरात देखील सकाळी सात ते २ वाजेपर्यंत सर्व आस्थापना खुल्या करण्याचे जिल्हा प्रशासनाने आदेश दिले आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेप्रमाणेच दुसरी लाट थोपवण्यातही प्रशासनाच्या चोख कामगिरीमुळे व जनतेच्या उत्स्फूर्त सहकार्यामुळे यश आले. औरंगाबादची एकूण कामगिरी उजवी ठरली व त्यामुळे प्रादुर्भाव कमी झालेल्या जिल्ह्यांमध्ये आपल्याला स्थान लाभले. अजूनही रुग्णसंख्या वाढत असलेल्या १८ जिल्ह्यांप्रमाणे संभाजीगरात लॉकडाऊन वाढवावा लागला नाही.

अशात नियम धाब्यावर बसविणाऱ्या मुठभर व्यापाऱ्यांनी व त्यांच्या समर्थकांनी कामगार उपायुक्तांना धमकावणे व कायदा सुव्यवस्था पायदळी तुडविणे अशोभनीय म्हटले पाहिजे. जिल्ह्यातील २ लाख ९६ हजार ७५६ दुकाने व आस्थापनांपैकी ८२ आस्थापनांनी शासनाच्या निर्बंधांना झुगारून प्रतिबंधीत कालावधीत आपली दुकाने उघडी ठेवली. ८२ पैकी ४६ प्रकरणाची सुनावणी घेऊन त्यांचे सील उघडण्यास मान्यता दिली. उर्वरित ३६ आस्थपानांची सुनावणी प्रलंबित आहे. त्यांच्यावर टाळेबंदीची कारवाई होणे क्रमप्राप्त होते. त्यामुळे उर्वरित ९९ टक्क्यांहून अधिक नियम पाळणाऱ्या व्यापाऱ्यांप्रति आदर व्यक्त झाला. वास्तविक सर्व मान्यवरांनी नियम व कायदे पाळणाऱ्याचा सन्मान करायचे सोडून कायद्याची पायमल्ली करणाऱ्यांची पाठराखण करावी हे अनाकलनीय म्हटले पाहिजे. निर्बंध पाळणारे नागरिक व यंत्रणा राबविणारे अधिकारी-कर्मचारी यांच्यामुळेच कोरोनाची लाट आपण थोपवू शकलो. आणि पुढेही ही एकजूटच आपल्याला सुरक्षित ठेवील, असा विश्वास श्री. देसाई यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *