नूतन वसाहतीसह सर्व झोपडपट्टीधारकांना तात्काळ पीआर कार्ड देणार..!
जालना : जालना शहरात दिवसाढवळ्या खून- दरोडे पडत आहेत, गावठी पिस्तुले, तलवारी खुलेआम सापडत आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे जालना शहराची बदनामी होत असून, शहरात उत्तर-प्रदेश, बिहारसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, याठिकाणचे प्रस्थापित लोकप्रतिनिधी बघ्याची भूमिका घेत आहे. शहरातील गुन्हेगारीचा बिमोड करून भयमुक्त वातावरणासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी माझ्यासारख्या सर्वसामान्य उमेदवारास नागरिकांनी निवडून द्यावे, असे आवाहन जालना विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार पत्रकार अब्दुल हाफिज यांनी केले आहे.
जालना शहरातील नूतन वसाहत, चंदनझिरा भागात अपक्ष उमेदवार अब्दुल हाफिज यांच्या प्रचारार्थ शनिवारी, रात्री जाहीर सभा झाल्या. या दोन्हीही सभांना नागरिकांचा मोठा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी या जाहीर सभेत उमेदवार अब्दुल हाफिज बोलत होते. व्यासपीठावर ऑल इंडिया मुस्लिम संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अन्सारी, ज्येष्ठ नेते अहमद बिन सईद चाऊस, खाजा अमिरोद्दीन, जॉर्ज उगले, गणेश भालेराव, शिवराज जाधव, जयहिंद सोशल ग्रुपचे इक्बाल शेख, जुबेर पटेल, जुनेद खान आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
पुढे बोलताना उमेदवार अब्दुल हाफिज म्हणाले की, मी गेल्या 35 वर्षांपासून जालना शहरात काँग्रेस पक्षाचे निःस्वार्थीपणाने काम करीत होतो, मात्र मी पक्षाकडे उमेदवारी मागितली तर प्रस्थापितांनी दबावतंत्राचे राजकारण केले, हे सर्व जालनेकरांना माहिती आहे. गेल्या 35 वर्षांपासून शहरात आलटून-पालटून सत्ता भोगणाऱ्या लोकप्रतिनिधींनी जालना शहराचा बट्ट्याबोळ केला आहे. विकासाच्या नावाने सर्वत्र बोंबाबोंब असून, सामान्यांना मूलभूत सोयीसुविधा मिळत नाही, असे सांगून अब्दुल हाफिज म्हणाले की, जालना शहरात प्रचंड गुंडागर्दी वाढली आहे. दिवसाढवळ्या खून, दरोड्यांच्या घटना घडत आहेत. शहरात गावठी पिस्तुलांचा खुलेआम वापर होत आहे, दररोज तलवारी सापडत आहे. त्यामुळे शहरातील सामान्य माणूस सुरक्षित राहिलेला नाही. शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी सत्ताधारी आजी-माजी लोकप्रतिनिधींनी कधीही प्रयत्न केलेले दिसत नाहीत, त्यांनी पोलीस प्रमुखांची कधी बैठक घेऊन त्यांना जाब विचारलेला दिसत नाही. त्यामुळे शहरातील गुन्हेगारी वाढण्यास कारणीभूत असलेल्या लोकप्रतिनिधींना मतदारांनी घरी बसवून, आपल्याला निवडून दिल्यास, शहरातील गुन्हेगारी संपुष्टात आणून दाखवू, असे आश्वासन अब्दुल हाफिज यांनी दिले.
जालना शहरातील नूतन वसाहत, चंदनझिरा, संजयनगर, गांधीनगर, कन्हैय्यानगर,अशा झोपडपट्टया आहेत. या झोपडपट्टी भागात गोरगरीब, दलित, मुस्लिम, अल्पसंख्याक, कष्टकरी, मजुरी करणारा मोठा वर्ग राहत आहे. या भागातील मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्या जात आहे. या भागांतील नागरिकांना पीआर कार्ड देण्याच्या नावाखाली गेल्या 35 वर्षांपासून मतांचे राजकारण करून, झुलवत ठेवल्या जात आहे. मी निवडून आल्यास तातडीने शहरातील सर्व झोपडपट्टीधारकांच्या पीआर कार्डचा प्रश्न सोडविला जाईल, असे आश्वासन उमेदवार अब्दुल हाफिज यांनी दिले आहे. जालना शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आणि शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी येत्या 20 तारखेला मला पेनाची निब या निशाणीसमोरील बटन दाबून भरघोस मतांनी निवडून द्यावे, अशी विनंती अब्दुल हाफिज यांनी यावेळी केली.
यावेळी शब्बीर अन्सारी, अहमद बिन चाऊस, जॉर्ज उगले यांची भाषणे झाली. या कार्यक्रमास महिला, तरुण व नागरिकांची मोठी उपस्थिती होती.