18 दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
औरंगाबाद: जायकवाडी प्रकल्पात होत असलेली पाण्याची आवक लक्षात घेता आज दि. 25-07-2022 रोजी दुपारी 04.00 वाजता जीवंत साठा 90.02% एवढा आहे व पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस होत असून, त्यामुळे पाणलोट क्षेत्रातील नदी, नाल्यांद्वारे, जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढत असल्यामुळे धरणाची पाणी पातळी वाढत आहे. त्यामुळे आज सायंकाळी 18 दरवाजे उघडले असून, जायकवाडी जलाशयातून गोदावरी नदीत 9432 क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
धरणाचे (R.O.S) परिचलन सुचीनुसार आवश्यक असणारी पाणी पातळीचे नियमन करावयाचे असल्याने आज सोमवारी सायंकाळी 06:00 वा. धरणाच्या गेटमधून/ सांडव्याद्वारे गोदावरी नदीमध्ये 9432 क्युसेकने पुरपाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. तसेच आवक बघून विसर्ग कमी/ जास्त करण्यात येईल. गोदावरी नदी काठच्या दोन्ही तीरावरील लोकांना सतर्क राहणेबाबत तसेच नदीपात्रात कुणीही जाऊ नये, पाळीव प्राणी, गुरे, विद्युत मोटारी तसेच इतर तत्सम साहित्य इत्यादी तत्काळ काढून घेण्याबाबत, तसेच कुठलीही जीवित वा वित्तहानी होणार नाही, याबाबत उक्त गावांना तत्काळ सावधानतेचा इशारा देणे संबधी संबंधीत यंत्रणेने खबरदारी घ्यावी, असे आवाहन जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते जलपूजन: पैठण जायकवाडी धरणाचा (नाथ सागर जलाशय) पाणीसाठा 90 टक्क्याच्यावर पोहचत असल्याने आज सायंकाळी 18 दरवाजे अर्धा फुटाने उचलत नऊ हजार 432 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. तत्पूर्वी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते जलाशयाचे विधिवत पूजन झाले, त्यानंतर त्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात वक्र दरवाजाचे बटन दाबून गोदावरी नदी पात्रात विसर्ग सुरू केला आहे.
यावेळी अधीक्षक अभियंता समाधान सब्बीनवार, जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे, तहसीलदार दत्तात्रय निलावाड, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहुल यांची उपस्थिती होती. सध्या जायकवाडी धरणात 36 हजार क्यूसेक्स यावेगाने पाणी दाखल होत आहे.सध्या धरणाचा पाणी साठा 90 टक्क्यांहून अधिक झाला आहे. सोडण्यात आलेला विसर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने नदी पात्र दुथडी भरुन वाहात आहे. नदी काठावरील नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी चव्हाण यांनी यावेळी नागरिकांना केले.
थोडक्यात जायकवाडी जलाशय:
जलाशय पाणीपातळी: 463.345 मी.
जीवंत साठा: 1954.356 दलघमी.
जीवंत साठा टक्केवारी: 90.02%