मुंबई: मुंबई आणि मुंबई पोलिसांची बदनामी केल्याप्रकरणी अभिनेत्री कंगना राणावतवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कंगनाला महाराष्ट्रासह मुंबईत राहण्याचा अधिकार नाही, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे कंगनावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली.
कंगनाने मुंबई पोलिसांची बदनामी केलीय. त्यामुळे कंगनाला महाराष्ट्रासह मुंबईत राहण्याचा अधिकार नाही, अशी प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी व्यक्त केली आहे. कंगनामुळे मुंबई पोलिसांची बदनामी होत आहे. आमचे पोलीस अधिकारी तिच्या विधानाची पाहणी करतील आणि त्यानंतर काय तो निर्णय घेतील, असंही अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. त्यामुळे कंगनावर कारवाई होण्याचे संकेत मिळत आहेत.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी कंगनावर टीका केल्यानंतर कंगनाने थेट मुंबईची तुलना पाकिस्तान व्याप्त काश्मीरशी केली होती. ‘संजय राऊत यांनी मला जाहीर धमकी दिली असून पुन्हा मुंबईत येऊ नकोस, असं धमकावलं आहे. मुंबईच्या रस्त्यांवर आजादी ग्रॅफिटी आणि आता ही जाहीर धमकी, मला मुंबई पाकिस्तान व्याप्त काश्मीरसारखी का वाटत आहे, असा सवाल कंगनानं तिच्या ट्विटमध्ये केला होता. त्यावरून राजकीयच नव्हे तर बॉलिवूडमधूनही संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.