# किसान रेल्वे नगरसोल येथून गुवाहाटी ला रवाना.

नांदेड: दक्षिण मध्य रेल्वे ने नेहेमीच शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालाला चांगली बाजारपेठ प्राप्त व्हावी या करिता सतत करत असलेल्या प्रयत्नात आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.  या संदर्भात  बुधवार, 5 जानेवारी रोजी दक्षिण मध्य रेल्वे ने महाराष्ट्रातून पहिली किसान रेल्वे सुरू केली.  कांद्याने भरलेला प्रारंभिक रॅक नांदेड विभागातील नगरसोल ते गुवाहाटी पर्यंत सुरू झाला, नांदेड विभागातील ही पहिली किसान रेल आहे.

कृषी क्षेत्राच्या मार्केटींगकरिता अडचणी मुक्त, सुरक्षित व जलद वाहतूक सेवा उपलब्ध करून देताना कृषी क्षेत्राचे उत्पन्न वाढविण्यासाठी किसान रेल चालवण्याची संकल्पना भारत सरकारने सुरू केली आहे.  शेतकऱ्यांना आणखी प्रोत्साहित करण्यासाठी अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने “ऑपरेशन ग्रीन्स –टॉप टू टोटल” च्या अंतर्गत किसान रेल गाड्यांद्वारे अधिसूचित फळे आणि भाजीपाल्यांच्या वाहतुकीवर 50% वाहतूक दर सवलत देण्याची घोषणा केली.  त्या अनुषंगाने दक्षिण मध्य रेल्वे च्या महाराष्ट्रातील प्रथम किसान रेल्वेलाही कांद्याच्या वाहतुकीसाठी 50% दर सवलत देण्यात आली आहे.

यापूर्वी, माल गाड्यांमधून नगरसोल स्थानकातून कांद्याची लोडिंग अधूनमधून होत असे.  तथापि, या कांद्यांची मालगाड्यांमधून वाहतूक करण्याकरिता  शेतकरी/ व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात माल खरेदी करावा लागत असे,  जेणेकरून संपूर्ण रेल्वे भार क्षमता  (पूर्ण ट्रेन लोड क्षमता) पूर्ण होऊ शकेल.  तसेच एवढ्या मोठ्या प्रमाणावर माल गोळा करण्याकरीता खूप जास्त मालवाहतुकीच्या साधनांची आवश्यकता लागत असे, मालवाहतूक करणाऱ्या ग्राहकांसाठी हे एक कठीण काम होते. यावर मात करण्यासाठी नांदेड विभागाच्या मालवाहतूक टीमने शेतकरी/ व्यापारी समुदायाशी नियमित बैठक घेतली, या बैठकीमध्ये त्यांना त्यांच्या मालाची वाहतूक किसान रेल्वे ने मालगाडीच्या तुलनेत अधिक सुलभतेने,  कमी खर्चात, त्रास-मुक्त आणि जलद वाहतूक कशी करता येईल या विषयी माहिती देण्यात आली. तसेच किसान रेल्वे च्या इतर सुलभ फायद्यांविषयी जागरूक केले.

नांदेड माल वाहतूक टीम च्या या सर्व सातत्याने केलेल्या विपणन प्रयत्नांमुळे किसान रेल्वे सुरु झाली आहे.  शेतकरी तसेच व्यापारी या सुविधामार्फत जास्तीत जास्त गाड्यांचा भार घेण्यास/ वापर करण्यास इच्छुक असल्याचे दर्शवित आहेत.

नांदेड विभागातील पहिली किसान रेल्वे आज 5 जानेवारी, 2021  ला नगरसोल स्थानकातून फलाट क्र.1 वरून सायंकाळी 05.30 वाजता निघाली.  या किसान रेल्वे मध्ये प्रत्येकी 23 टन क्षमतेच्या 22 पार्सल व्हॅन आहेत.  ही गाडी 50 तासांच्या अल्प कालावधीत 2500 कि.मी. अंतर पार करून सुमारे 522 टन कांद्याच्या माल घेवून 7 जानेवारी रोजी रात्री 09.00 वाजता गुवाहाटी गुड्स कॉम्प्लेक्सवर, आसाम मध्ये पोहोचेल.

गजानन माल्या, महाव्यवस्थापक दक्षिण मध्य रेल्वे यांनी नांदेड विभागातील अधिकाऱ्यांनी/ कर्मचाऱ्यांनी नगरसोल स्थानकातून यशस्वीपणे किसान रेल सुरु करण्याकरिता केलेल्या प्रयत्नाबद्दल आनंद व्यक्त केला.  श्री.माल्या यांनी शेतकरी आणि व्यापारी यांना आवाहन केले आहे की, किसान विशेष रेल्वे करिता अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालया मार्फत दिल्या जाणाऱ्या विशेष सवलती, संधी आणि सुविधा वापरून आपला व्यवसाय वृद्धिंगत करावा. तसेच दक्षिण मध्य रेल्वे ची  मालवाहतूक वाढवण्यात  हातभार लावावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *