“भटक्यांचे भावविश्व” कार के. ओ. गिऱ्हे यांचे निधन.

 

औरंगाबाद: भटक्या विमुक्त आणि आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते, साहित्यिक के. ओ. गिऱ्हे (वय६५) यांचे शनिवारी पहाटे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्यावर गोलवाडी या मूळगावी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी लेखिका जनाबाई गिऱ्हे, तीन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे.

मागील ४० वर्षांपासून भटक्या-विमुक्तांच्या न्याय हक्कासाठी ते कार्यरत होते. कोरोना संकटात भटक्या-विमुक्तांच्या पालावर जाऊन त्यांना जीवनावश्यक साहित्याची मदत करणारे गिऱ्हे यांच्या अचानक जाण्याने सामाजिक कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे. कृषी विभागातून सेवानिवृत्त झाल्यानंतर गिऱ्हे यांच्या सामाजिक आणि साहित्य कार्याला गती मिळाली होती. भटक्यांचे भावविश्व या मासिकातून त्यांनी वंचितांच्या वेदनांना वाचा फोडली. या मासिकाद्वारे भटक्यांचे साहित्य संमेलन घेण्यास त्यांनी दोन वर्षांपूर्वी सुरुवात केली होती. भटक्या विमुक्तांच्या वेदना त्यांनी ग्रंथातून मांडल्या होत्या. त्यांचे भटके हे आत्मकथन गाजले होते. “गोपाल समाज इतिहास व संस्कृती” ,”दोरीवरचं काळीज” ,”भटक्यांची स्वातंत्र्याची पहाट कधी उजाडेल” ,”मजल दरमजल” ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.”भटक्यांचे भावविश्व” या मासिकाचे संपादक म्हणून ते अखेरपर्यंत कार्यरत होते.

गोपाळ समाजातील पारंपरिक अनिष्ठ प्रथांना विरोध करीत गिऱ्हे यांनी पत्नी जनाबाई गिऱ्हे यांना शिकवले होते. त्यामुळे त्या गोपाळ समाजातील पहिल्या शिक्षिका ठरल्या. जनाबाई यांचे “मरणकळा” हे आत्मकथन प्रचंड गाजले आहे. आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून त्यांनी भटक्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला होता. गिऱ्हे यांनी अखिल भारतीय भटके आदिवासी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते. सध्या महाराष्ट्र राज्य भटके विमुक्त संघर्ष समितीचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. ज्येष्ठ साहित्यिक टी. एस. चव्हाण, कवी एकनाथ खिल्लारे, सामाजिक कार्यकर्ते दुर्गादास गुढे, अंबादास रगडे, पंडित तुपे, प्राचार्य हसन इमानदार, प्रा. ग. ह.राठोड, कवी किसन पवार, प्रा. शिवाजी वाठोरे, भारत ससाणे, प्रा.सुधीर आणवले, कोंडीबा हटकर , कवी ना. तू. पोगे, भीमराव मोटे, प्रा. प्रकाश वाघमारे, सर्जेराव मुसळे, प्रा.नवनाथ गोरे, ज्येष्ठ पत्रकार डाॅ. शेषराव पठाडे यांच्यासह ज्येष्ठ साहित्यिक डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी गिऱ्हे यांना श्रद्धांजली वाहिली.

ज्येष्ठ पत्रकार प्रशांत पवार:
भटक्याकाराचे यातनापर्व…
भटक्या विमुक्त चळवळीतील मराठवाड्याचे खंदे कार्यकर्ते आणि लेखक के. ओ. गिऱ्हे यांचे आज निधन झाल्याची बातमी कळली. अनेकदा फोनवर चर्चा, औरंगाबादला असलो की न चुकता जनाबाई आणि त्यांना भेटण्यासाठी मारलेली चक्कर आणि समाजासाठी झटण्याची या दाम्पत्याची तळमळ हे सारचं आठवलं. माझ्या ३१ ऑगस्ट १९५२ या पुस्तकात के. ओ. गिऱ्हे यांच्यावर एक स्वतंत्र प्रकरण आहे. या भटक्याकाराचे यातनापर्व ऐकलं की अक्षरश:हादरून जातो.
गिऱ्हे यांना विनम्र अभिवादन…
………………..
पालात महा बाप पडला होता. त्याला पाहताच त्याच्या गळ्यात गळा पडून धाय मोकडून रडू लागलो. बा मला सोडीत नव्हता. बर झालं आता तू मह्या भेटीला आला. आता महा भरोसा नाही. शाळा शिक बाळ. बाचा आवाज खाली खाली जात होता. आता बाची वाचा बसली ती कायमचीच. पालात आरडाओरड सुरू झाला. सकाळ उजाली, भराभर गोपाळ जमा झाले. आता बाला पालातून बाहेर काढले अन् चार जणांनी धरून दगडांवर न्हावू घातले. पण इतर जण बाच्या मढय़ाला हात लावीत नव्हते. एक घंटा झाली, दोन घंटा झाली पण बाच्या मढय़ाला कुणीच शिवेना. माय गोपाळांच्या पाया पडाया लागली. ‘म्या आता ह्या मढय़ाला काय करू? तुमच्या समोर पदर पसरते, पण कायबी करा मह्या दादल्याची मूठमाती करा. एक पंच उठला अन् बोलता झाला, ‘वंकऱ्याची दाढी उतरविली नायी, त्या बदल्यात आता दोन दिस घालावे लागतीया. हाय का राजी तरच मढ्याला शिवतोय. नाय तर निघून जातोया…

दोन दीस जिथं खायाला पैसा नायी तिथं दोन दिवस कशी घालायची. आमच्यात चांदीच्या वस्तऱ्याने दाढी उतरावी लागते. पंचांना बकरा मारून गाव जेवण द्यावे लागते. आता म्या बाची झोळी धरली. बाला झोळीत टाकले, काका पुढं, मी त्याच्या मागे. एका हाताने आसू पूसीत होतो. तीन-चार मैल चालत होतो, बाला पुरायला जागा मिळत नव्हती. एका ठिकाणी जागा गावली तर गावातली माणसं धावत धावत आली. इथं पुरू नका ह्या मढय़ाला नाय तर दुसऱ्याला ह्या मुडद्याबरोबर मातीत घालीन. कुठलं आले हे भटके, आमाला त्रास द्यायला. दीस मावळतीला जात होता, पावसाची रिमझीम सुरूच होती. अनेकांना विनवण्या केल्या पण कुणीच मढं पुरायला जागा देत नव्हते. अखेर नदीकाठी चार हाताची जागा गावली अन् तिथंच बाची माती खंदली…
ज्या हाताने त्या शाळकरी मुलाने बासाठी माती खंदली त्याच हातात पुढे त्याने लेखणी घेतली. जात पंचायतीच्या जाचक नियमांमुळे स्वत:च्या बापाला पुरण्यासाठी चार हात जागाही न मिळणे, इतक्या जळजळीत वास्तवतेला सामोरे गेल्यानंतर साहजिकच त्यांची लेखणी आसूड बनली. या आसूडाने मग पांढरपेशांच्या नि मध्यमवर्गीयांच्या विश्वावर सपासप फटके मारले. शोषितांची दु:ख किती नाना परीची असतात याचे प्रत्ययकारी दर्शन त्याने दिले. केवळ ‘वेगळं’ म्हणून त्याची वास्तपुस्त करून भागणार नाही तर त्यातल्या जीवघेण्या समस्यांचा, त्यातल्या असह्य घुसमटीचा, त्यातल्या अन्यायाचा नि छळाचा, त्यातल्या अज्ञानाचा, निरक्षरतेचा नि अंधविश्वासांचा नि या साऱ्यांची परिणती म्हणून या साऱ्यांच्या अस्फूट, मूक वेदनेचा आलेख त्याने आपल्या लेखणीतून मांडला. भटक्यांच्या या मूक वेदनेला वाचा फोडणारी ती व्यक्ती म्हणजे के. ओ. गिऱ्हे. लेखिका जनाबाई गिऱ्हे यांचे ते पती आणि मार्गदर्शकदेखील… त्यांनी फक्त आपल्या पत्नीलाच शिकण्यासाठी प्रोत्साहित केले नाही तर ते स्वत: देखील एम.फिल झाले. अनेक वर्षे कृषी खात्यात नोकरी केली. गेल्या 30-40 वर्षांपासून भटक्या-विमुक्त चळवळीमध्ये स्वत:ला झोकून दिले. समाजाला त्यांच्या हक्काची जाणीव करून दिली. जो गोपाळ समाज शिक्षणापासून कोसो दूर राहिला त्याच समाजाच्या गिऱ्हे यांनी ‘गोपाळ समाज, परंपरा आणि इतिहास’, भटक्या, दोरीवरचं काळीज, यातनापर्व इतकी ग्रंथ संपदा लिहिली. ज्या गोपाळ समाजाच्या मुलांनी शाळेची पायरी पाहिली नव्हती त्या गोपाळ समाजाच्या गिऱ्हे यांच्या या ग्रंथसंपदेवर अनेक विद्यार्थी आज पीच.डी. करत आहेत. महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमात त्यांची पुस्तके समाविष्ट केली आहेत.

समाजाचा इतिहास लिहिणे आणि परंपरा सिद्ध करणे हे तसे कठीण कार्य. परंतु स्वकुलाचा-स्वसमाजाचा इतिहास लिहिण्याची या महाराष्ट्राची परंपरा असल्याने आपणही आपल्या या गोपाळ समाजाचा इतिहास व परंपरा लिहू शकू असा विश्वास वाटल्याने त्यांनी हे आव्हान स्वीकारले.गोपाळ जातीच्या जातपंचायतीतील मौखिक कथांचा अभ्यास करताना या समाजाच्या काही परंपरांचे आणि इतिहासाचे संकलन करू लागले.
गोपाळ समाज: परंपरा आणि इतिहास हा ग्रंथ जेव्हा प्रकाशित झाला तेव्हा मात्र गोपाळ समाजात प्रचंड प्रक्षोभ उफाळला. आपल्या समाजाची पारुषी कशाला उजेडात आणली म्हणून गिऱ्हे आणि त्यांच्या कुटुंबाचा छळ सुरू झाला. पदोपदी मानहानी होऊ लागली. जातपंचायत दुषणे देऊ लागली. विडी-काडी बंद झाली. गिऱ्हे नुसते एवढय़ावर थांबले नाहीत. त्यांनी हा ग्रंथ स्वत:च प्रकाशित केला आणि गेले मढीच्या यात्रेला. अहमदनगर येथे होळीनंतर मढी येथे भटक्या समाजाची खुप मोठी यात्रा भरते. मढी हे भटक्यांचे सर्वोच्च न्यायालाय. याच मढीच्या यात्रेत जातपंचायत जो निर्णय देईल तो अंतिम असतो. गिऱ्हे जेव्हा त्यांचे हे पुस्तक घेऊन मढीला गेले तेव्हा गोपाळ समाजाचा पाच-सहा हजारांचा जमाव गोळा झाला होता. अनेक कार्यकर्ते, पत्रकार यांनी गोपाळ समाजाला परिवर्तनाची कास धरण्यास प्रवृत्त केले. गिऱ्हे यांनी गोपाळ समाजाचा इतिहास लिहून कसे मोलाचे कार्य केले आहे हे त्यांना पटवून देण्यात आले आणि त्याच मढीमध्ये मग के.ओ. गिऱ्हे आणि त्यांच्या पत्नी जनाबाई गिऱ्हे यांचा त्याच गोपाळ समाजाने सत्कार केला.

स्वत:ला दुरुस्त करून इतरांना दुरुस्त करीत राहण्याचा ध्यास उराशी बाळगून प्रत्यक्ष कृती करणारे क्वचितच असतात. कचरू गिऱ्हे आणि जनाबाई गिऱ्हे हे दाम्पत्य मात्र याला अपवाद ठरले. शिक्षणासाठी इतका खस्ता घाऊनही कचरू गिऱ्हे बीए, एमए, एम.फिल, बीजे झाले तर जनाबाई बीए, डीएड होऊन शिक्षिका झाल्या. प्रामाणिक, मनमिळाऊ, विनम्र स्वभाव, मृदूभाषा यामुळे ते विपुल लोकसंग्रह करू शकले. त्यांच्या रक्ताचे नसतील पण महाराष्ट्रभर त्यांचे आज अनेक चाहते तयार झाले . कारण त्यांनी आपले साहित्यरुपी जीवन, विचार गोपाळ समाजासह तमाम भटक्या विमुक्तांच्या पालापालात, पांडय़ात, बेडय़ात, पोळात, वाडय़ा-वस्तीत, घराघरांत पोहचवले. त्यांनी वकृत्त्वापेक्षा लेखणीरुपी कर्तृत्वातून बोलणे अधिक पसंत केले.
(प्रशांत पवार यांच्या, ३१ ऑगस्ट १९५२ या पुस्तकामधून, साभार)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *