पुणे: पोषक स्थितीमुळे सोमवारी (दि.1) नैऋत्य मोसमी पाऊस (मान्सून) केरळमध्ये स्थिरावला असून, या भागात जोरदार पावसाने हजेरी लावण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान, अरबी समुद्राच्या दक्षिणपूर्व आणि दक्षिण पश्चिम भागासह लक्षव्दीप बेटावर खोल कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. पुढील बारा तासात या पट्ट्याचे तीव्र कमी खोल दाबाच्या पट्ट्यात रूपांतर होणार आहे. त्यानंतर मंगळवारी (दि.2) या पट्ट्याचे चक्रीवादळामध्ये रूपांतर होणार आहे. हे चक्रीवादळ कोकण (हरिहरेश्वर,रायगड), दक्षिण गुजरात, मुबंई पार करून पुढे उत्तर मध्यमहाराष्ट्र (नाशिक,धुळे, जळगाव,नंदुरबार) या भागापर्यंत धडकणार आहे. त्यामुळे कोकण, मुंबईसह उत्तर मध्यमहाराष्ट्रात अतिवृष्टी होईल, असा अंदाज भारतीय हवामानाशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मान्सून सोमवारी केरळात स्थिरावला असून, पोषक वातावरणामुळे केरळ आणि किनारपट्टीवर जोरदार बरसण्यास सुरूवात झाली आहे. मान्सूनला आगेकूच करण्यास पोषक स्थिती असल्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसात कर्नाटक ते अगदी गोवा तसेच तळकोकणापर्यंत धडक मारण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यासह पालघर, ठाणे, पुण्यात उद्या जोरदार पावसाची शक्यता: दरम्यान, दोन जून रोजी अरबी समुद्रात तयार होणाऱ्या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात चक्रीवादळासह, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह चार जूनपर्यंत जोरदार पाऊस बरसण्यची शक्यता आहे. विशेषत: पालघर भागात अतिवृष्टी तर ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, बीड, लातूर, या भागात मान्सूनपूर्व पाऊस जोरदार हजेरी लावणार आहे.