पुणे: दक्षिण कोकणाबरोबरच मध्यमहाराष्ट्राच्या काही भागात सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट तसेच मेघगर्जनेसह पुढील तीन दिवस म्हणजे 22 सप्टेंबर पर्यंत मुसळधार व अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. तर मराठवाडा व विदर्भातही मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, 23 सप्टेंबरनंतर पाऊस कमी होण्याची शक्यता आहे.
हवामान विभगाने दिलेल्या माहितीनुसार कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्यमहाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली तसेच सोलापूर, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव मराठवाड्यातील लातूर, बीड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, नांदेड या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे
राज्यात गेल्या काही दिवसांपासून अधूनमधून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. मात्र, दोन दिवसांपासून पुन्हा पावसाचा जोर वाढू लागला आहे. सध्या आंध्रप्रदेशच्या उत्तर किनारपट्टीवर चक्रीय स्थिती आहे. तसेच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. या स्थितीचा जोर वाढला आहे. त्यामुळे दक्षिण कोकणात मुसळधार तसेच अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तर मध्यमहाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार तर मराठवाडा व विदर्भात देखील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.