बीडः गुटखा तस्करी प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यामुळे अडचणीत आलेले शिवसेनेचे बीड जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या पदाला स्थगिती देण्यात आली आहे. लवरकच नव्या जिल्हाप्रमुखांचे नाव जाहीर करण्यात येईल, असे शिवसेनेने म्हटले आहे. शिवसेनेच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
बीड जिल्ह्यात पाच दिवसांपूर्वी प्रशिक्षणार्थी सहाय पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने तीन ते चार ठिकाणी छापेमारी करून लाखो रुपयांचा गुटखा पकडला होता. हा सगळा धंदा शिवसेनेचे बीड जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांचे असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे त्यांच्यावर केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर कुंडलिक खांडे हे फरार झाले होते. मात्र, फरार असतानाही ते शिवसेना सचिव अनिल देसाई यांच्या स्वागताला हजर झाले होते. यावरून चांगलेच वादंग पेटले होते.
आज सामना दैनिकातून कुंडलिक खांडे यांच्या जिल्हाप्रमुख पदाला स्थगिती देण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे. लवकरच नव्या जिल्हाप्रमुखाचे नाव जाहीर केले जाईल, असेही त्यात म्हटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येते. या निर्णयामुळे बीडच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
बीड जिल्ह्याच्या इतिहासात एखाद्या राजकीय पक्षाचा जिल्हा प्रमुख असलेल्या व्यक्तीवर गुटखा तस्करी प्रकरणात गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे राज्यभर हे प्रकरण गाजले होते. गुन्हा दाखल होऊनही खांडे हे उजळ माथ्याने बीड जिल्ह्यात पक्षाच्या कार्यक्रमात फिरताना दिसून येत होते. त्यावरून टिकेची झोड उठल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आणि ही कारवाई करण्यात आली.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकात बीडमध्ये जिल्हाप्रमुखपदाला स्थगिती अशा मथळ्याखाली वृत्त देण्यात आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना बीड जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या पदाला स्थगिती देण्यात आली असून नवीन जिल्हाप्रमुखाचे नाव पक्षप्रमुख लवकरच जाहीर करतील, असे या वृत्तात म्हटले आहे.